देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिरात समाजोपयोगी उपक्रम

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांतर्गत फणसोप येथे आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिरात श्रमदान, समाजप्रबोधन, आरोग्यजागृती, पर्यावरण संवर्धन व सृजनशीलतेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले.

शिबिरात स्वयंसेवकांनी नलावडेवाडी येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारला. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने दगड, माती व गोण्यांच्या सहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत फणसोप गावच्या सरपंच सौ. राधिका साळवी व ग्रामपंचायत अधिकारी सदानंद शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूजा माने यांनी स्वयंसेवक व ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

पथनाट्य कार्यशाळेत युवा रंगकर्मी सुयोग बेंडल यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे तंत्र स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सादरीकरण करून घेत आवाज, देहबोली व लोकसंवादावर भर देण्यात आला. सायंकाळी आयोजित कला कार्यशाळेत सौ. श्वेता जोगळेकर यांनी वारली चित्रकलेची ओळख करून देत स्वयंसेवकांकडून प्रत्यक्ष चित्रे रेखाटून घेतली.

विद्यार्थ्यांनी फणसोप येथील अंगणवाडी, प्राथमिक शाळा व बौद्धविहार परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर गांडूळ खत व बायोगॅस प्रकल्पांना भेट देऊन शाश्वत शेती व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती घेतली. नंतर जुवी फणसोप येथील श्री दत्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमसंस्कार व नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ झाली.