मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी जत्रोत्सवास उत्साहात प्रारंभ!
6 जानेवारी रोजी जत्रोत्सवाची सांगता
मसुरे | झुंजार पेडणेकर : देवालयाच्या गाभाऱ्या सह सभा मंडपात केलेली विविध रंगी फुलांची आरास, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने झळाळलेला मंदिर परिसर, विष्णू अवतार आकर्षक प्रवेश द्वार, भक्तांकडून होत असलेला देवी भगवती मातेचा जयजयकार, आणि श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी आतुरलेले भक्त आणि ध्वनीक्षेपकवर चालू असलेला ‘श्री देवी भगवती माते नमो नमः ‘ हा नाम जप अशा भक्तीपूर्ण वातावरणात देवगड तालुक्यातील मुणगे गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीच्या वार्षीक जत्रोत्सवास शुक्रवार 2 जानेवारी रोजी प्रारंभ झाला. दुपार नंतर भाविकांची दर्शन रांग सभामंडपा बाहेर पोहोचली होती.
वस्त्रालंकारानी सजविलेले देवीचे रुप पाहून भविक भक्त कृतार्थ होत होते. देवीची प्रथेप्रमाणे पुजा झाल्या नंतर गावच्या वतीने देवीची ओटी तसेच सर्व मानकऱ्यांच्या ओट्या रितीरीवाजा प्रमाणे भरल्या नंतर सकाळी 11 वाजता भविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ झाला. देवी भगवतीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तीमय बनला आहे. सायंकाळी गोंधळी नृत्य, भजन, रात्री पालखी मिरवणूक, कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम झाले.
यात्रा कालावधीमध्ये थेट देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेता येत असल्याने या कालावधीमध्ये भविकांचा ओघ प्रचंड वाढलेला असतो. पाच दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाची सांगता 6 जानेवारी रोजी रात्री लळीताच्या कार्यक्रमाने होणार आहे. जत्रोत्सवा निमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरामध्ये व्यापाऱ्यानी आपली दुकाने थाटली असून मंदिर ट्रस्टच्या कार्यालयातून तसेच स्वागत कक्षातून सर्व भाविकाना आवश्यक सुचना करण्यात येत आहेत. माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरानी भगवती देवीचे आशीर्वाद घेतले. दरम्यान दै. प्रहारच्या वतीने प्रसीध्द झालेल्या यात्रा विशेषांकाचे प्रकाशन देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त पुरुषोतम तेली, अनिल धुवाळी, वसंत शेट्ये, दादा सावंत, अनिल धुवाळी, तसेच मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, शिक्षक प्रसाद बागवे आदी उपस्थित होते. यात्रा परिसर विविध मिठाई, खेळणी, प्रसाद, हॉटेल, मनोरंजन खेळणी या दुकानांनी भरून गेला आहे. पार्किंग साठी तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. आई भगवती मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन व्हावे यासाठी देवस्थान कमिटी कडून नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधी मध्ये जास्तीत जास्त भावीकानी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन देवस्थान कमीटीच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाध्ये, सचिव निषाद परुळेकर यानी केले आहे.













