आंबडपाल येथे जिल्हास्तरीय कृषी दिन मेळावा उत्साहात; प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, सेंद्रिय शेतीचा पुरस्कार
स्वप्निल कदम- कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक नाविन्यपूर्ण योजनांचा गांभीर्याने अभ्यास करून त्या जिल्हा परिषदेमार्फत प्रभावीपणे राबविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. कृषी, पशुधन विकास आणि शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हा परिषद कायम कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबडपाल येथील भद्रकाली मंदिराशेजारील सभागृहात जिल्हास्तरीय कृषी दिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, मिलिंद नाईक, सिताराम तेली, आंबडपालचे सरपंच महेश मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, आरती पाटील, रुपेश कानडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक ऋषिकेश गावडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवत, जयप्रकाश परब, शीतल पुंड, कृषी विकास अधिकारी सचिन कांबळे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, डॉ. ज्ञानेश्वर बडे, योगेश धुरी, मंगेश प्रभू, अर्चना घावणळकर, अर्चना बंगे, राजन परब, सुरेश तानावडे, गंगाराम सडवेलकर, सुप्रिया वालावलकर, अमित भोगले यांच्यासह लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
प्रमोद कामत म्हणाले की, सिंधुदुर्ग हा शेती, बागायती आणि मत्स्यव्यवसायासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. मात्र बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्पर्धा यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या विविध योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, जलसंधारण आणि कृषी मूल्यवर्धन यावर भर देत युवा पिढीनेही शेतीकडे आकर्षित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या ६ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष आणि निवडक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांवर चर्चा करण्यात येईल आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा परिषद सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी शेतकऱ्यांनी उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. महिलांचा शेतीतील वाढता सहभाग ही सकारात्मक बाब असून शेतीतून आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्वांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक सुनील सावंत (कणकवली-फणसनगर), द्वितीय गोविंद धुरी (आमडोस, मालवण) आणि तृतीय आनंद सावंत (आंब्रड, कुडाळ) यांनी पटकावला. कुडाळ तालुकास्तरावर प्रथम बाबली परब (तेंडोली), द्वितीय नागेश सावंत (जांभवडे) आणि तृतीय उत्तम देसाई (पिंगुळी-धुरुटेंबनगर) यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांनी केले, तर सूत्रसंचालन अमित तेंडुलकर यांनी केले.
भयमुक्त शेतीसाठी प्रभावी उपाययोजनांची गरज – रामकृष्ण पंतवालावलकर
बांदा येथील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण पंतवालावलकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठे बदल होत असले तरी सेंद्रिय आणि पारंपरिक शेतीचे महत्त्व कायम राखणे आवश्यक आहे. मात्र भातशेती व बागायती पिकांचे उपद्रवी प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने जिल्हा परिषद आणि शासनाने ‘भयमुक्त शेती’साठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी त्यांनी जोरदार मागणी केली.













