मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
गुहागर (प्रतिनिधी):
तालुक्यातील शृंगारतळी-जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत होता याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा सबंधित विभागाला दिला होता.या इशाऱ्यानंतर मनसेच्या दणक्याने या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे.
या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. या रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्यासाठी हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत होता. याठिकाणी भविष्यात गंभीर दुर्घटना होऊ शकते, असा इशारा देत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली होती. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांना निवेदन देऊन मनसेने कठोर भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. मनसेच्या या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांनी तत्काळ दखल घेत उपअभियंता स्वप्नील पाटील व शाखा अभियंता रेणुका ओतारी यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पाहणी केली होती. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील वार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत या रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सध्या हा प्रस्ताव तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात असून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली होती. अखेर या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली असून मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर हे स्वतः उपस्थित राहून कामाची देखभाल करत आहेत.या दुरुस्ती कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












