परुळे | प्रतिनिधी : परुळे युवक कला क्रीडा मंडळ, परुळे यांच्या वतीने आयोजित स्व. ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २ जानेवारी रोजी श्री देव आदि नारायण रंगमंचावर सादर झालेल्या पहिल्या दिवशीची पहिली बाबा वर्दम थिएटर, कुडाळ यांची ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सादर झाली. अत्यंत वेगळ्या संकल्पनेवर आधारित असलेली ही एकांकिका प्रेक्षकांना विचार करायला लावणारी ठरली.
या एकांकिकेची कथा दोन सामान्य माणसांच्या आयुष्यातील एका अपघाती क्षणाभोवती फिरते. सदाशिव वाटवे व यशवंत फडके या दोन भूमिका गाडीखाली येतात आणि मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे काही सेकंद शिल्लक असतात. त्या काही सेकंदांत मृत्यूचा अनुभव घेत असताना त्यांच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छा, भविष्यातील योजना, नातेसंबंध, केलेल्या चुका आणि न केलेल्या गोष्टी त्यांच्या डोळ्यांसमोर झरझर उलगडत जातात. “जीवन किती क्षणभंगुर आहे” हे या एकांकिकेचे मध्यवर्ती सूत्र प्रभावीपणे मांडले आहे.
लेखक योगेश सोमण यांनी संकल्पना अत्यंत सुबक आणि परिणामकारक शब्दांत गुंफली आहे. संवाद साधे असूनही अर्थपूर्ण आहेत. मृत्यू आणि जीवन यामधील सीमारेषा, माणसाची असहायता आणि तरीही जगण्याची तीव्र इच्छा हे लेखनातून प्रकर्षाने जाणवते. कोणताही अनावश्यक उपदेश न करता लेखकाने प्रेक्षकांपर्यंत संदेश पोहोचवला आहे.
अभिनयाच्या दृष्टीने दोन्ही कलाकारांनी उत्तम समतोल साधला आहे. सदाशिव वाटवे यांनी अंतर्मुख, शांत आणि विचारमग्न व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली, तर यशवंत फडके यांनी भावनिक चढ-उतार, भीती, आशा आणि पश्चात्ताप यांचे अचूक दर्शन घडवले. दोघांमधील संवाद, देहबोली आणि भावप्रकटीकरण नैसर्गिक व प्रामाणिक वाटते.
एकांकिकेचा शेवट अनपेक्षित पण वास्तवदर्शी आहे. दोघेही चमत्कारिकरीत्या वाचतात; मात्र अपघात घडवणाऱ्या गाडीचालकांना बक्षीस मिळते आणि या दोघांना आत्महत्येचा प्रयत्न म्हणून अटक केली जाते—ही बाब व्यवस्थेतील विसंगती आणि वास्तवावर भाष्य करते. हा शेवट प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उभे करून जातो.
एकूणच वन सेकंदस लाईफ ही एकांकिका केवळ मनोरंजन न करता जीवनाचे मोल, वेळेचे महत्त्व आणि माणसाच्या मानसिक अवस्थेचे प्रभावी चित्रण करणारी ठरते. सुंदर लेखन, परिणामकारक सादरीकरण आणि संवेदनशील अभिनय यामुळे ही एकांकिका स्पर्धेत निश्चितच लक्षवेधी ठरली.
आजची दुसरी इन सर्च ऑफ ही एकांकिका मुंबईतील समाजव्यवस्थेतील संशय, अन्याय आणि न्यायाच्या शोधावर प्रकाश टाकते. भयभीत अवस्थेत रुद्र आपटेकडे आलेली सौम्या आणि तिच्यावर असलेला संशय, तसेच तिच्या प्रियकराच्या आत्महत्येचे वास्तव, ही कथा प्रभावीपणे उलगडते. रुद्रच्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला न्याय न मिळाल्याने तो चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची मानसिक घुसमट प्रकर्षाने जाणवते.
सौम्या आणि रुद्र यांच्यातील संवादातून दोघेही एकमेकांच्या चुका ओळखतात आणि आत्मपरीक्षण करतात. शेवटी सौम्या निघून जाते, पण न्याय, सुरक्षितता आणि माणुसकीचा शोध अपूर्णच राहतो. आशयगर्भ विषय, गंभीर मांडणी आणि विचारप्रवर्तक शेवट यामुळे ही एकांकिका प्रभावी ठरते.
आजची तिसरी देवराई ही बालएकांकिका पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश प्रभावीपणे मांडते. जंगल, झाडे आणि निसर्ग यांचे रक्षण हा या एकांकिकेचा मध्यवर्ती आशय आहे. मालवणी भाषेतील सहज, ओघवती मांडणीमुळे एकांकिकेला स्थानिक रंग लाभतो आणि प्रेक्षकांशी थेट नाते जोडले जाते.
कथेच्या केंद्रस्थानी शापित देवराई ही व्यक्तिरेखा आहे. जंगलातील झाडे वाचवण्यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. देवराईचा नवरा लाकूडतोड करताना मृत्यू पावतो आणि त्यानंतर देवराईला शाप मिळतो. त्या शापामुळे देवराई जंगलाचे रक्षण करणारी शक्ती बनते. ही लोककथेच्या छटेतली कल्पना बालमनाला भावणारी आणि परिणामकारक आहे.
एकांकिकेतील लहान मुलांनी जंगलात बिया रुजवून निसर्गाला नवसंजीवनी दिल्याचे दृश्य अत्यंत भावस्पर्शी ठरते. त्यांच्या सकारात्मक कृतीमुळे शापित देवराई मुक्त होते आणि “निसर्ग वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश ठळकपणे समोर येतो.
सर्व बालकलाकारांचे सादरीकरण आत्मविश्वासपूर्ण व उत्स्फूर्त आहे. संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि नृत्य यांचा समतोल वापर एकांकिकेची परिणामकारकता वाढवतो. दिग्दर्शक किशोर नाईक यांनी बालकलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असून संपूर्ण सादरीकरण शिस्तबद्ध व प्रभावी वाटते.
एकूणच देवराई ही बालएकांकिका मनोरंजनाबरोबरच “झाडे लावा, झाडे जगवा” हा सामाजिक संदेश प्रभावीपणे देणारी ठरते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही एकांकिका निश्चितच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.
आजच्या दिवसातील चौथी एकांकिका कारवा कोल्हापूर ची म्हावं उठलाय … ही एकांकिका ग्रामीण जीवनातील एका वेगळ्या, वास्तवाशी निगडित समस्येवर प्रकाश टाकते. गावरान भाषेतील मांडणीमुळे एकांकिकेला प्रामाणिकपणा आणि स्थानिक रंग लाभतो. कथानक एका गावातील दोन वाड्यांमधील संघर्षाभोवती फिरते.
मधमाश्यांमुळे संपूर्ण गावात भीती, संशय आणि वैरभावना निर्माण होते. गावातील ऐक्य ढासळते, संसार उद्ध्वस्त होतात आणि सामान्य माणसांचे जगणे कठीण बनते. हा सारा संघर्ष एकांकिकेत प्रभावीपणे उभा राहतो.
एकंदरीत सादरीकरण प्रभावी आहे. कलाकारांनी त्या पट्टीतील बोलीभाषा, देहबोली आणि मानसिकता नैसर्गिकपणे साकारली आहे. संवाद, प्रसंगरचना आणि अभिनय यामुळे ही समस्या केवळ कथानक न राहता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
म्हावं उठलया ही एकांकिका मधमाशी पालनासारख्या व्यवसायाचे दुष्परिणाम, गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक तणाव वास्तवदर्शी पद्धतीने मांडते. स्थानिक प्रश्नांना रंगमंचावर आणत ही एकांकिका विचार करायला लावणारी आणि प्रभावी ठरते.
आजच्या दिवसाची शेवटची एकांकिका गंधर्व थिएटर, मीरारोड यांची कडी ही एकांकिका प्रेम, नकार, अहंकार आणि आत्मसंघर्ष यांचा सखोल वेध घेणारी ठरते. दोन प्रेमी युगुलांच्या आयुष्यात वडिलांच्या नकारामुळे आलेले वादळ आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक घुसमट या एकांकिकेचा केंद्रबिंदू आहे.
खरे प्रेम म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून प्रिय व्यक्तीच्या सुखाचा विचार करणे, हा विचार या अंतर्मनाच्या संवादातून ठळकपणे मांडला जातो. प्रेमासाठी स्वतःला आवर घालणे, मनाची कडी आतून लावणे आणि वेदना स्वतः झेलणे, हाच खरा त्याग असल्याचे येथे अधोरेखित होते.
शरीर आणि मन या दोन्ही भूमिकांचे सादरीकरण अत्यंत प्रभावी झाले आहे. देहबोली, भावाभिव्यक्ती आणि संवादातून अंतर्गत संघर्ष ठळकपणे प्रेक्षकांसमोर उभा राहतो. संपूर्ण सादरीकरण संयत, भावपूर्ण आणि परिणामकारक ठरते.
कडी ही एकांकिका प्रेमात असताना पालकांच्या भावनांचा विचार करणाऱ्या मुलींसाठी, तसेच प्रेमात अंध झालेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाचा संदेश देते. कधी कधी प्रेम जपण्यासाठी मनाचे सर्व दरवाजे “कडी” लावून बंद करावे लागतात—हा विचार मनाला भिडणारा ठरतो. एकूणच ही एकांकिका भावनिक, विचारप्रवर्तक आणि प्रभावी सादरीकरण करणारी आहे.
एकंदरीत पहिल्या दिवशीच्या सर्वच एकांकिका सुंदररित्या सादर झाल्या.
सौ. पूर्वा प्रथमेश नाईक
परुळे युवक कला क्रीडा मंडळ.













