कलावलय ने दशावतार नाट्य मंडळांचा केलेला सन्मान आमच्या साठी फार मोलाचा : तुषार नाईक

सिंधुदुर्गातील ९ पारंपरिक दशावतार मंडळाचा वेंगुर्ले येथे सन्मान..

वेंगुर्ले : दाजी नाईक
आजच्या स्पर्धेच्या आणि बदलत्या काळातही मूळ गाभा न ढासळता पारंपरिक दशावतार लोककला अजून ही त्याच जोमाने सुरू आहे. आमच्या पूर्वजांनी त्या काळी कोणत्याही सोयी नसताना ही कला जोपासली आणि आजही ती कला त्याच ताकतीने असेल त्या ठिकाणी साजरी होते. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे कलावलय या संस्थेने आमच्या दशावतार नाट्य मंडळांचा असा मोठ्या रंगमंचावर केलेला सन्मान आमच्या साठी फार मोलाचा आहे. असे प्रतिपादन नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे संचालक तुषार नाईक यांनी केले.

वेंगुर्ले येथे एकांकिका स्पर्धेचे औचित्य साधून कलावलय वेंगुर्ला या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतारी मंडळांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम कालेलकर सभागृहात संपन्न झाला.

वेंगुर्ला येथे कलावलय आयोजित एकांकिका स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त कला क्षेत्रात योगदान देणा-यांचा अलिकडे सन्मान केला जात आहे. दरम्यान, दशावतार ही कोकणची संस्कृती आहे. सुमारे आठशे वर्षांपासून या कलेच्या माध्यमातून पुराणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले जात आहे. यासाठी अलिकडे बरीच दशावतार नाट्य मंडळे निर्माण झाली आहेत. परंतु, दहा ते बारा पिढ्या या कलेचा वारसा जपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नऊ पारंपरिक दशावतार मंडळांच्या मालकांचा तसेच संचालकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये आरोलकर दशावतार, चेंदवणकर-गोरे दशावतार, आजगांवकर दशावतार, बाळकृष्ण गोरे दशावतार, नाईक मोचेमाडकर दशावतार, वालावलकर दशावतार, मामा मोचेमाडकर दशावतार, खानोलकर दशावतार आणि पार्सेकर या दशावतार नाट्य मंडळांचा समावेश आहे. हा सन्मान लेखक, दिग्दर्शक तथा ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, कलावलयचे अध्यक्ष बाळू खांबकर, सचिव संजय पुनाळेकर, समिता गुणे, परिक्षक प्रमोद लिमये, श्रीनिवास नार्वेकर, बी.के.सी.असोसिएशनचे अध्यक्ष सतिश डुबळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सौरभ पाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.