सावंतवाडी : तळवडे येथील स्थानिक व्यवसायिक विजय कुंभार यांच्या दुकानाला अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या दुर्देवी घटनेमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून, तो पुन्हा उभा करण्यासाठी त्यांना मदतीची अत्यंत गरज होती. या घटनेची गंभीर दखल घेत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदीप गावडे यांनी पुढाकार घेऊन कुंभार यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली.
सदर मदतीची रक्कम आज तळवडे येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजय कुंभार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे बाधित व्यावसायिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या मदत सुपूर्त कार्यक्रमा दरम्यान माजी सभापती पंकज पेडणेकर, शंकर सावंत, विकास गावडे, प्रेमानंद डिचोलकर, मधुसूदन तळवणेकर, दीपक कोरगावकर, सुशांत गावडे, तसेच सुभाष पेडणेकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.













