माजगावच्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :

माजगांवची ग्रामदेवता श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा परिसरातून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या सातेरी देवी आणि महादेव मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती.

​सकाळी मंदिरात पूजा आणि अभिषेक हे धार्मिक विधी पार पडले. उत्सवासाठी म्हालटकर देवघराकडून पालखी व अब्दागीर, घाडी मानकऱ्यांकडून तरंगकाठी, चौगुले मानकऱ्यांकडून सातेरीची उत्सवमूर्ती, तर महादेव मंदिराकडून महादेवाची उत्सवमूर्ती मिरवणुकीने मंदिरात आणली गेली. त्यानंतर देवीला सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून व मानाची ओटी भरल्यानंतर सार्वजनिक दर्शनास सुरुवात झाली.

​सातेरी देवी माहेरवाशिणींची पाठीराखी मानली जात असल्याने, ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती. अनेकांनी आपले नवस फेडले. देवीचा शृंगार आणि तेजस्वी रूप पाहून भाविक भारावून गेले. जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान समितीने दर्शनाचे योग्य नियोजन केले होते.

​रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक झाले. गावातील चाकरमानी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे माजगावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.