सावंतवाडी उभा बाजार येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
हनुमान मित्र मंडळ उभा बाजार व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपना दवाखाना आणि जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात महाआरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलन करून उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिक, महिला आणि रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, अपना दवाखान्याचे डॉ. हर्ष साळगावकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर उपस्थित होते.

याशिवाय बाबल्या दुभाषी, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, अरुण भिसे, बाळू कासार, हर्षल पोकळे, सचिन मळीक, कुंदन टोपले, हो ष ग कोरगावकर, कपिल कोरगावकर, परिचारिका तृप्ती अंधारी, गंगा सुतार, परिचर यशवंत परब आणि लॅब टेक्निशियन गायत्री वारंग यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
​कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना अपना दवाखान्याच्या अध्यक्षा सुकन्या टोपले यांनी भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी स्वतःचे तसेच आपल्या आई-वडील व मुलांचे आरोग्य तपासून घेण्याचे आवाहन केले.

नगरसेविका सायली दुभाषी यांनी अपना दवाखान्यामार्फत लिपीड प्रोफाईल, शुगर, ब्लड प्रेशर तपासणीसह मोफत औषधे पुरवली जातात अशी माहिती दिली. डॉ. हर्ष साळगावकर यांनी अपना दवाखान्यात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत (रविवार व सरकारी सुट्टी वगळता) दर दोन महिन्यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध असल्याचे सांगितले.
​जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर यांनी शासकीय आरोग्य योजनांचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रत्येक कुटुंबाने पंतप्रधान आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ५ लाखांचे कार्ड काढून घ्यावे आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठांनी १० लाखांपर्यंतचे वयो वंदना कार्ड तयार करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. देशात २३९९ प्रकारच्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांत मोफत होत असल्याने याबद्दल जनजागृती होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच चाळीशीनंतर दर चार महिन्यांनी लिपीड प्रोफाईल तपासणी करावी, कोलेस्टेरॉल २२० पेक्षा जास्त असल्यास हृदयविकार व पॅरालिसिसचा धोका वाढतो, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

​शिबिरात बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबल्या दुभाषी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले, तर शेवटी हनुमान मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बाबल्या दुभाषी यांनी आभार मानले.