देवगड :महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवगड–जामसांडे नगरपंचायतीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या अंतर्गत कुडाळवाडी/देवगड/वैभववाडी या शहरी भागांमधील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ई-टॉयलेट पुरविणे व बसविणे, निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, सुनिची यांच्या अधिपत्याखाली भटक्या श्वानांचे निर्बंधीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरण मोहिम राबविणे आणि देवगड जामसांडे नगरपंचायत अंतर्गत घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी वाहन व ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील, स्वच्छता सभापती बुवा तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर, तसेच सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी, “देवगड जामसांडे नगरपंचायत सुंदर, स्वच्छ आणि आदर्श शहर बनवण्यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” असा शब्द दिला. स्वच्छता, नागरी सुविधा आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.













