पर्ससीन मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त

देवगड बीच परिसरात अवैध मासेमारी; नौकेत २६ परप्रांतीय खलाशी आढळले

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमांतर्गत कारवाई सुरू; पारंपरिक मच्छीमारांकडून स्वागत

देवगड : प्रतिनिधी

देवगड बीच परिसरात अवैध पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी (२५ ऑक्टोबर) कारवाई करत देवगडची ‘स्वामीराज’ ही नौका जप्त केली. सकाळी साधारण १० ते ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेचे नोंदणी क्रमांक IND-MH-५-MM-५२४८ असून नौकेच्या मालकाचे नाव निलम निषाद हिरनाईक असे आहे. कारवाईदरम्यान अन्य काही पर्ससीन नौकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळाली.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी देवगड किरण वाघमारे यांनी पोलिस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली. देवगड किनाऱ्यासमोर अवघ्या तीन ते चार वाव पाण्यात पर्ससीन पद्धतीने मासेमारी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित नौकेवर कारवाई केली.

‘स्वामीराज’ नौकेची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण २६ परप्रांतीय खलाशी आढळून आले. संबंधित नौकेकडे १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारी करण्यासाठी एक्सेस पास असल्याची माहिती असूनही किनाऱ्याजवळ मासेमारी केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ मधील तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने विभागाने नौका ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

किनारी भागात नियमांचे उल्लंघन करून पर्ससीन मासेमारी होत असल्याने स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार केली जाते. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईचे पारंपरिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे. किनारपट्टीवर नियमित गस्त वाढवून अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असून, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे हित जपण्यासोबतच सागरी संसाधनांच्या संवर्धनालाही मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.