वेंगुर्ले मध्ये आकारास येत आहे “जापनीज झेन उद्यान”

शहराला लाभणार नवे पर्यटन आकर्षण…

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले शहराच्या पर्यटन नकाशावर लवकरच आणखी एक आकर्षक पर्यटन स्थळ झळकणार असून, “जापनीज झेन उद्यान” नव्या रूपात साकारत आहे. वेंगुर्ले गाडीअड्डा परिसरातील डोंगरावर वसलेल्या श्री. देव मारुती मंदिर परिसरात हे उद्यान विकसित केले जात असून, सध्या या कामाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण होत आले आहे.

शासनाच्या सहकार्याने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या माध्यमातून हे उद्यान विकसित करण्यात येत असून, शहरातील शांत व निसर्गरम्य ठिकाण पर्यटनासाठी खुलं करण्याचा हा प्रयत्न आहे. डोंगरावरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या अत्यंत सुसज्ज व आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. या पायऱ्यांमुळे भाविकांबरोबरच पर्यटकांनाही सहज व सुरक्षितपणे मंदिर व उद्यानापर्यंत पोहोचता येणार आहे.

उद्यानात विविध ठिकाणी बसण्यासाठी सुंदर कट्टे, चढावाच्या मध्यभागी सिंहासनासारखी आकर्षक खुर्ची, तसेच फुलपाखराच्या आकारातील बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे. या अनोख्या रचनेमुळे उद्यानात फिरणाऱ्यांना वेगळाच अनुभव मिळणार आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक लॅम्पद्वारे विद्युतीकरण करण्यात आले असून, सायंकाळच्या वेळी हा परिसर अधिकच रमणीय दिसणार आहे.

शहराच्या गजबजाटापासून दूर, शांतता लाभलेल्या या ठिकाणी उभारण्यात येणारे हे उद्यान पर्यटकांसाठी मनःशांती देणारे ठिकाण ठरणार आहे. डोंगरावरील मंदिर परिसरातून वेंगुर्ले शहराचे दिसणारे मनमोहक दृश्य पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरणार असून, शांत वातावरणात ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करणारा आहे.

वेंगुर्लेकरांसाठी विरंगुळ्याचे नवे ठिकाण ठरणारे हे जापनीज झेन उद्यान, पर्यटकांनाही निश्चितच आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने वेंगुर्ले शहराच्या विकासात हे उद्यान महत्त्वाची भर घालणारे ठरणार आहे.