केंद्रप्रमुखांचे रखडलेले वेतन तातडीने अदा करावे

महाराष्ट्र राज्य पदवीधर ,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे निवेदन; मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष

कणकवली(प्रतिनिधी):राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या सुमारे ३,५०० हून अधिक केंद्रप्रमुखांचे मागील काही महिन्यांचे वेतन रखडले आहे. सप्टेंबर २०२६ महिन्यासह मागील दोन ते तीन महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्यामुळे केंद्रप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटने’च्या वतीने राज्य सरचिटणीस मनोज मराठे ,राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिले असून, रखडलेले वेतन तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय व शैक्षणिक जबाबदाऱ्या केंद्रप्रमुख अहोरात्र पार पाडत असतात. मात्र, नियमित वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांना दैनंदिन कौटुंबिक खर्च भागवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज व अन्य कर्जाचे मासिक हप्ते (EMI) थकीत झाल्याने बँकांकडून दंड आकारला जात आहे. तसेच, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण व औषधोपचाराचा खर्च भागवणे कठीण झाल्यामुळे या अधिकाऱ्यांमध्ये व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे आणि राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये रखडलेले वेतन त्वरित वितरित करावे, वेतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि यापुढे दरमहा नियमित वेतन मिळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, वेतनाअभावी थकीत झालेल्या कर्जाच्या हप्त्यांवर बँकांकडून आकारला जाणारा अतिरिक्त दंड माफ करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अनेक कुटुंबांचे संपूर्ण आर्थिक नियोजन मासिक वेतनावर अवलंबून असल्याने शासनाने या परिस्थितीची संवेदनशीलतेने दखल घेऊन सर्व केंद्रप्रमुखांचे वेतन त्वरित वितरित करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतची माहीती महाराष्ट्र राज्य पदवीधर ,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य प्रतिनिधी अनंत राणे , जिल्हाध्यक्ष सुहास सावंत , कार्याध्यक्ष उत्तम हरमलकर , सचिव नंदकिशोर गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती संघटनेच्या वतीने दिली.