मना घडवी संस्कार!

 ▪️श्री भगवती देवी चरणी मन प्रबोधन संस्कार वर्गाची स्वरांजली                 

मसुरे | झुंजार पेडणेकर :सध्याच्या काळात संस्कारांकडे अधिक लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज आहे. संस्कार जर असतील तर माणसाच्या मनातील परमेश्वर परमात्मा मोठा होतो, जागृत होतो आणि मनातील दानव म्हणजे वाईट शक्ती नष्ट होते. यासाठीच लहानपणापासून संस्कार प्रयत्न महत्त्वाचे असतात असे विचार शरयू घाडी यांनी श्री भगवती देवालय येथे व्यक्त केले.

मुणगे येथील मन प्रबोधन संस्कार वर्ग आणि पंखाविना भरारी प्रेरणा कार्यक्रमातून शरयुताई घाडी यांच्या संकल्पनेतून श्री भगवती देवालय येथे जत्रोत्सवाचे औचित्य साधून संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आजची बदलती सामाजिक परिस्थिती पाहता मुलांच्या मनाची सकारात्मक शक्ती वाढवणे सर्वांच्या हिताचे आहे. यासाठी आपल्या वेद वाङमयात ऋषी मुनींनी सांगितलेले संस्कार श्लोक महत्त्वाचे आहेत. काही माणसे देहाकडे चुकीच्या दृष्टीने पहातात पण आमच्या ऋषीमुनींना देहात देव दिसत होता. हे देवत्व वाढवणे म्हणजे संस्कार असेही सौ शरयू घाडी कार्यक्रमाचे निवेदन करताना म्हणाल्या.

श्री भगवती आई जत्रा उत्सवात मुलांनी सादर केलेले श्लोक, मंत्र, भक्ती गीते आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र भाविकांना भावल्याने छोट्या मुलांवर बक्षीसांचा वर्षाव झाला. एक वेगळी संस्कार पुष्पांजली भगवती आई चरणी अर्पण करण्याची संधी भगवती देवस्थानने दिल्याबद्दल शरयुताईनी आभार मानले.

या संगीत कार्यक्रमात लिनता महाजन, स्वरांगी प्रसाद बागवे, रूद्रेश परब, ओवी गुरव, आणि गायत्री मेस्त्री ह्या मुलांनी भक्ती गीते सादर केली. मिहीर महाजन आणि आराध्य महाजन ह्या चार वर्षांच्या मुलांचे पाठांतर सर्वांना आवडले.

सोबत सुहानी लब्दे , शर्वरी लब्दे , जगदीश लब्दे, स्वरा कारेकर, मिथीलेश लब्दे आणि नागेश घाडी आणि संगीता परब, सौ प्रणिधी प्रसाद बागवे सहभागी झाले होते. संस्कार वर्गासाठी श्री विजय बोरकर, श्री देवदत्त पुजारे, सुरेश बांदेकर, श्री विलास मुणगेकर, मुख्या. कुंज, प्रशिक्षक प्रसाद बागवे यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत असल्याचे शेवटी शरयू घाडी म्हणाल्या. सदर कार्यक्रमाला हार्मोनियम साथ भजनसम्राट राजेंद्र प्रभू तर तबला साथ विशारद शैलेश सावंत यांनी दिली. उपस्थित रसिक, भक्तांनी बक्षीसांचा वर्षाव विद्यार्थ्यांवर केला.