डीबीजेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘रेझिंग डे’ उत्साहात साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘रेझिंग डे’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील भाहादुले यांनीकेले. यामध्ये त्यांनी ‘रेझिंग डे’चे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त आणि सुरक्षा विषयक जाणीव निर्माण करणे हा आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विविध वेपन्स (शस्त्रे) प्रदर्शित करण्यात आली. शस्त्रांचे प्रकार, त्यांचा योग्य व सुरक्षित वापर, तसेच त्यासंबंधीची सविस्तर माहिती पीएसआय भरतेश हरूगिरे, आरसीपी अतुल पाटील, तसेच शुभम पालशेतकर, वैष्णवी पाटील आणि गायत्री पवार यांनी प्रभावीपणे सांगितली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा दलांच्या कार्यपद्धतीबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले असून एनएसएस विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी एनएसएस कार्यक्रमाधिकारी अविनाश पालशेतकर, उपप्राचार्य सौ. स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव आदी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.सौ.अंकिता टाकळे यांनी आभार मानले.