
महिला विभागात एस. एम. सिंधू. स्पोर्ट्स,कुडाळ तर पुरुष विभागात लक्ष्मीनारायण संघ,वालावल विजयी !
जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे चे पंचक्रोशी कला, क्रीडा, सांस्कृ.मंडळ फोंडाघाट तर्फे यशस्वी नियोजन !
फोंडाघाट /कुमार नाडकर्णी— फोंडा घाट आणि कबड्डी यांचे समीकरण आहे. किंबहुना ती गावाची ओळख आहे. प्रो कबड्डी ला लाजवेल अशी मोठी स्पर्धा यशस्वी पार पाडताना, अमित चव्हाण आणि त्याच्या मंडळातील सहकाऱ्यांनी शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यामुळे फोंडाघाट मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल उभारले जाईल. त्यामुळे नामवंत खेळाडू तयार होताना ,क्रीडांगणाचा लाभ सर्व खेळाडूंना घेता येईल.असे आश्वासन धावत्या भेटीदरम्यान सिंधू. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी खेळाडू,मंडळ आणि ग्रामस्थांना दिले. आणि त्यांचे कौतुक केले. यावेळी काल झालेल्या विजेत्या महिला संघांना त्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले…
भव्य- दिव्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना,तिन्ही बाजू प्रेक्षागृह, एका बाजूला विशाल मंच आणि भव्य प्रवेशद्वार, उत्कृष्ट प्रकाश योजना यामुळे सजलेली, ग्रामीण भागातील प्रो कबड्डी शी तुलना करणारी, वरिष्ठ पुरुष – महिला सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागात विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.यामध्ये महिला विभागात एस.एम. स्पोर्ट्स संघ ,कुडाळ यांनी, तर पुरुष विभागात लक्ष्मीनारायण संघ वालावल या संघानी विजयश्री पटकावली. सराव कॅम्प नंतर यामधून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघाची, राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे..
सलग दोन दिवस रात्री प्रकाश झोतात चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन राजन चिके यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केलेल्या ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. तर मनोज रावराणे यांनी जिल्ह्यातील एवढी मोठी स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल, सर्वांना शुभेच्छा देताना,क्रीडा संकुलाची मागणी केली. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रो कबड्डी सारख्या मोठ्या स्पर्धेत चमकण्याची संधी मिळेल, असे मनोगत दिलीप तळेकर यांनी व्यक्त केले..
व्यासपीठावर सुरेश सामंत, हेमंत फोंडेकर,बबन हळदिवे,संतोष कानडे, सुजाता हळदीवे, विश्वनाथ जाधव, वंदना तेली, स्नेहलता पांचाळ,गणेश हळदिवे,पवन भालेकर, मिलिंद लाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुसूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी केले.
महिला गटात १२ संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत एस. एम. सिंधू. स्पोर्ट्स,कुडाळ- प्रथम, जय गणेश मालवण- द्वितीय, एस.एम.फाउंडेशन, मालवण- तृतीय, यंग स्टार कणकवली, चतुर्थ यांनी क्रमांक पटकावले. तर आर्या चव्हाण- पक्कड, मिताली गावडे- चढाई, रिद्धी हडकर- अष्टपैलू यांना गौरविण्यात आले ….
दुसऱ्या दिवशी पुरुष गटात १८ संघांनी सहभाग घेतला. उद्घाटन सिंधू.जिल्हा कबड्डी असो. चे अध्यक्ष रुजारियो पिंटो यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिनेश चव्हाण- सहकार्यवाह, मार्टिन अल्मेडा- खजिनदार, संजय पेडणेकर, भूपेश राणे,विशाल पारकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटच्या अटीतटीच्या सामन्यात लक्ष्मीनारायण वालावल संघाने पंचक्रोशी फोंडाघाट संघाचा तीन गुणांनी पराभव करून विजयश्री पटकावली. …
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने, आणि कणकवली तालुका कबड्डी असो. च्या सहकार्याने, पंचक्रोशी कला, क्रीडा, सांस्कृ. मंडळाच्या संयोजनातून या स्पर्धा दोन रात्री उशिरापर्यंत उत्साहात संपन्न झाल्या. याकरिता अमित चव्हाण, अनिकेत पारकर,शुभम नार्वेकर, रवींद्र धुरी, संजय शेळके ,मधुकर पाटील, पोफळेसर, प्रसाद हळदीवे,विनोद भोगले, आनंद चिके,प्रणव भोगटे, सागर सामंत, उमेश पारकर, प्रणव भोगटे,विजय फोंडेकर, जयेश पटेल, अक्षय पाटील, आणि कबड्डी प्रेमींनी परिश्रमपूर्वक स्टेडियम उभारणीपासून समारोपापर्यंत सर्व विभागवार कामे मोठ्या उत्साहात पार पाडली. या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी उदंड उत्साहात आनंद घेतला..











