माजगाव कुंभारवाडा रस्त्याचे जितेंद्र गावकर यांच्याकडून स्वखर्चाने कॉंक्रिटीकरण

गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ता कॉंक्रिटीकरण झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान 

माजगाव:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पंचायत समितीचे माजगाव विभागाचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी आपल्या स्वखर्चातून तब्बल दोन लाख रुपये खर्च करून माजगाव कुंभारवाडा ते मेन रोड आणि संत गोरा कुंभार मंदिर या १०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून दिले आहे. ऐन सणाच्या काळात रस्त्याची ही महत्त्वाची अडचण दूर झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून मोठे समाधान व्यक्त होत असून जितेंद्र गावकर यांचे आभार मानले जात आहेत.

या रस्ता काँक्रिटीकरणाच्या प्रसंगी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तेंडुलकर, माजगावचे माजी उपसरपंच राजन पाटकर, बाबा भोगण, चंद्रकांत तळवडेकर, संतोष बांदेकर, दीपक पाटकर, सुरेश पाटकर, मोहन मांजरेकर, नितीन तळवडेकर आणि जयेश पावसकर यांच्यासह कुंभारवाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभारवाडा ते मेन रोड जोडणारा हा रस्ता संत गोरा कुंभार मंदिराकडे जात असल्याने गणेशोत्सवाच्या दिवसांत या मार्गावर नागरिकांची आणि भक्तांची मोठी वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन जितेंद्र गावकर यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर तातडीने स्वखर्चातून या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे आता कुंभारवाड्यातील ग्रामस्थांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांची ये-जा करण्याची कायमस्वरूपी सोय झाली असून, गावकर यांनी वेळेवर दाखवलेल्या या तत्परतेचे संपूर्ण गावातून कौतुक केले जात आहे.