‘खेळ पैठणीचा’ आणि ‘रक्तदान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने विविध सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी आयोजित केलेला ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपत घेतलेले ‘रक्तदान शिबिर’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.
महिलांसाठी रंगला ‘खेळ पैठणीचा’
दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत महिला पोलीस अंमलदार, पोलीस कुटुंबीय आणि शहरातील इतर महिला बचत गटांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभराच्या ताणतणावातून विरंगुळा मिळावा आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद लुटला.
रक्तदान शिबिरात ४० दात्यांचा सहभाग
आज, ७ जानेवारी २०२६ रोजी, सावंतवाडी पोलीस ठाणे, रोटरी क्लब सावंतवाडी, रक्तदाता संघटना आणि ‘ऑन कॉल ब्लड ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १:३० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिक अशा एकूण ४० जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी पोलीस दलाच्या सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. दयानंद गवस, नगरसेवक श्री. देव्या सूर्या, ॲड. श्री. भांबुरे तसेच कुडाळ, वेंगुर्ला, निवती, दोडामार्ग आणि बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी पोलिसांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे











