शाहुनगरातील दाम्पत्याच्या समोर घर जळून खाक

शाहूनगरातील सय्यद दाम्पत्य हतबल,मदतीची गरज

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : राजारामपुरीतील शाहूनगर परिसरातील सय्यद दाम्पत्याच घर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने जळून खाक झाले.पाचवीला पूजलेल्या दारिद्र्यातही सन्मानाने जगण्याची आस होती. त्यामुळेच राजारामपुरीतील शाहूनगर परिसरात छोट्याशा घरात राहणारे रशीद मक्तूम सय्यद आणि त्यांची पत्नी रेश्मा हे दाम्पत्य धडपडत होते. कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर ठेकेदाराकडे नोकरी करून ते मुलाच्या शिक्षणासाठी पै-पै जमा करीत होते; पण शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत डोळ्यांसमोर त्यांचे घर जळाले अन् त्यांनी साठवलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह स्वप्नांचीही राख झाली. मंगळवारी (दि. ६) सकाळी झालेल्या घटनेने सय्यद दाम्पत्याला मानसिक धक्का बसला.रशीद सय्यद यांचे शाहूनगरमध्ये वडिलोपार्जित छोटेसे घर आहे. या घरात ते पत्नी रेश्मा, मुलगा रमजान आणि मेहुणीसोबत राहतात. सय्यद दाम्पत्य कसबा बावड्यातील कचरा प्रकल्पावर रोजंदारीने काम करतात. दोघांना दरमहा प्रत्येकी नऊ हजार रुपये मिळतात. याशिवाय कचऱ्यात सापडणारे प्लास्टिक आणि भंगार विकून ते चार पैसे मिळवतात. यातील किमान दहा हजार रुपये ते दर महिन्याला साठवत होते. सुमारे अडीच लाखांची रोकड घरात एका पिशवीत ठेवली होती.

जळालेघराला आग लागल्याची माहिती मिळताच १५ मिनिटांत ते बावड्यातून शाहूनगरात पोहोचले. गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भडकलेल्या आगीमुळे ते घराजवळही पोहोचू शकले नाहीत. डोळ्यांसमोर जळणारे घर पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. आयुष्यभर कष्ट करून घेतलेल्या वस्तू, दागिने आणि रोकड हाताला लागेल की नाही, याची चिंता त्यांना सतावत होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविताच ते घरात गेले. स्फोटाने उद्ध्वस्त झालेल्या घरात जाताच त्यांचे उरलेसुरले अवसान गळून पडले. त्यांच्या पत्नीने पैशांची पिशवी काढून पाहिली असता त्यातून अर्धवट जळालेल्या नोटांचे पुडके बाहेर आले. लोखंडी कपाटातील दोन गंठण आणि एक अंगठी जवळपास वितळली होती. जळालेल्या नोटा आणि संसारोपयोगी साहित्याची झालेली राख पाहून सय्यद दाम्पत्याने हंबरडा फोडला. कष्टाने पै-पै साठवून उभ्या केलेल्या संसाराची डोळ्यांसमोर राख झाल्याचे पाहून ते कोसळले. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. आता नागरिकांतून सय्यद दाम्पत्यास मदत व्हावी, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे.