वागदे–ओसरगाव बोर्डवेसाठी स्वतंत्र विद्युत फिडर मंजूर

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न

नागरिकांनी केले समाधान व्यक्त


कणकवली :
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या आदेशामुळे आणि वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वागदे–ओसरगाव बोर्डवेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) स्वतंत्र विद्युत फिडर मंजूर करण्यात आला आहे.

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी प्रहार भवन येथे आयोजित केलेल्या विद्युत मंडळाच्या बैठकीदरम्यान सरपंच संदीप सावंत यांनी स्वतंत्र फिडरची मागणी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून वागदे येथून एकाच फिडरवरून सातरल, कासरल, वरवडे, बिडवाडी, रामगड, पिसेकामते, गोठणे, निरोम, आरे आदी अनेक गावांना वीजपुरवठा होत होता. त्यामुळे फिडरवर मोठ्या प्रमाणात लोड येत असून, कोणत्याही एका गावात बिघाड झाला तरी सर्व गावांचा वीजपुरवठा बंद करून दुरुस्ती करावी लागत होती.

स्वतंत्र फिडर मंजूर झाल्याने आता वीजेचा लोड कमी होणार असून, एका गावातील तांत्रिक अडचणीमुळे इतर गावांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. यामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

स्वतंत्र फिडरमुळे वागदे व परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत व विश्वासार्ह होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.