वेंगुर्ले (मठ) :
“आपण ज्या नावाने शाळा ओळखतो ते रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे मठ गावचे सुपुत्र असून त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८५० रोजी झाला. इंग्रजी राजवटीत आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फाळणीपूर्वी क्वेटा येथे वैद्यकीय सेवा केली. इंग्रजी, संस्कृत, उर्दू व पश्तू अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. दर दोन वर्षांनी ते न चुकता मठ गावी येत असत. त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने येथील शाळेसाठी आपली जमीन दान केली. अशा थोर व्यक्तींचे कार्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ओळख सिंधुरत्नांची’ या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान मठ येथे संपन्न झाले. यावेळी बोलताना डॉ. लळीत म्हणाले की, “शालेय अभ्यासक्रम शिकत असताना आपल्या परिसरातील व जिल्ह्यातील थोर व्यक्तींचा परिचय करून घेतल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी प्रेरणा मिळते. त्यामुळे गेली चार-पाच वर्षे मी ‘सिंधुदुर्गातील माणिकमोती’ शोधून त्यावर लेखन करत आहे.”
मठगावचे रायसाहेब रामजी खानोलकर यांचे चिरंजीव, भारतीय पॅथॉलॉजीचे जनक पद्मभूषण डॉ. वसंतराव खानोलकर यांचे कार्यही अत्यंत महान असून ते सिंधुरत्नांमधून वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी डॉ. लळीत यांनी केंद्रशाळेला भेट दिली. मुख्याध्यापक तांबे व सहकारी शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. पुढे बोलताना डॉ. लळीत म्हणाले की, “आता मी व माझे सहकारी प्रत्येक माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात ‘ओळख सिंधुरत्नांची’ ही व्याख्याने अखंडपणे देणार असून वर्षभरानंतर त्यावर आधारित ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत हजारो रुपयांची पारितोषिके देण्यात येतील.” विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेवटी त्यांनी शके १३१७ सालातील मठ गावातील ‘मांगल्याचा मठ’ येथील शिलालेखाची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी ही सर्व माहिती नवीन व रोचक ठरली.
या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील जाधव, श्री. गोसावी, सौ. सावंत, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब मठकर, मिलिंद खानोलकर आदी उपस्थित होते. श्री. गोसावी यांनी डॉ. बाळकृष्ण लळीत यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या समूह प्रार्थना गीताने झाली.











