देवरूख महाविद्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

देवरूख (प्रतिनिधी):

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये एन. एस. एस. (+२स्तर) विभागाकडून मराठी पत्रकारिता दिनानिमित्त पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याकरीता संगमेश्वर तालुक्यामधील प्रिंट व डिजिटल क्षेत्रात पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार व प्रतिनिधींना यानिमित्त आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. मयुरेश राणे यांनी केले.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते उपस्थित पत्रकार व प्रतिनिधीना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुरेश सप्रे, सागर मुळ्ये, सचिन मोहिते, निलेश जाधव, सुरेश करंडे, मीरा शेलार-भोपळकर, शेखर जोगळे, मिथुन लिंगायत यांचा समावेश होता. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेमधील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला व निष्ठेने पत्रकारितेचा वसा घेतलेल्या उपस्थित पत्रकारांना त्यांच्या चांगल्या कार्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. उपस्थित पत्रकारांच्यावतीने जेष्ठ पत्रकार सागर मुळ्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल आढावा घेतला. पत्रकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेले विविधांगी कार्य, पत्रकारिता क्षेत्राला दिलेली नवी ओळख व योग्य दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली. बाळशास्त्री जांभेकरांची हुशारी व कर्तृत्वाची अनेक उदाहरणे दिली, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक संधी म्हणून प्रामाणिक व समाजपयोगी पत्रकारिता करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. विद्यार्थिनी आकांक्षा शिवगण(११वी कला) हिने बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट संक्षिप्त स्वरूपात आपल्या वक्तृत्वातून उलगडून दाखवला.

कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. धनंजय दळवी यांनी आपल्या मनोगतात संगमेश्वर तालुक्यातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये कार्य करणाऱ्या ८०च्या दशकातील पत्रकार बंधूंच्या कार्याची आठवण करून, त्यांच्या मौलिक कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर गेली तीन दशके ते आजपर्यंत वृत्तपत्र पत्रकारितेत झालेले बदल अधोरेखित करून, कार्यरत असणाऱ्या प्रिंट मीडिया क्षेत्रातील पत्रकार व प्रतिनिधी यांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. संगमेश्वर तालुक्यातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या डिजिटल न्यूज चॅनेलबाबत माहिती देऊन त्याची उपयुक्तता स्पष्ट करून, त्यांच्या सामाजिक योगदानाबाबत माहिती दिली. आजच्या वेगवान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वृत्तपत्रांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नसून, वृत्तपत्रे ही माहिती आणि ज्ञानाने समृद्ध करणारी, मनोरंजन, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान यासह सर्व विषयांमध्ये वाचकांना परिपूर्ण करणारी एक प्रचंड मोठी डेटा बँक असल्याने नमूद करून, विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रांचे वाचन नियमित करावे असे आवाहन करून प्रा. दळवी यांनी आपल्या वाणीला विराम दिला.

या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांसह एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. सुनील सोनवणे, क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वसंत तावडे, प्रा. विजय मुंडेकर, सहाय्यक अमोल वेलवणकर व रुणाली पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमांमधील सत्कारमूर्तींचे, तसेच आयोजकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.