​लोककला आणि परंपरेचा जागर : विवाह सोहळा अन् ओव्यांचा गजर

माजगाव-म्हालटकरवाडा येथील सात दिवसीय धालोत्सवाची उत्साहात सांगता

​सावंतवाडी । सचिन रेडकर :
कोकणच्या भूमीतील लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या आणि स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या माजगाव-म्हालटकरवाडा (महादेव देवघर) येथील ऐतिहासिक धालोत्सवाची गुरुवारी, ८ जानेवारी रोजी भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. गेली सात रात्र अखंड सुरू असलेल्या या उत्सवातून माजगावच्या ग्रामस्थांनी आपली समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आजही तितक्याच निष्ठेने जिवंत ठेवल्याचे पाहायला मिळाले.

​धालोत्सवाची शेवटची रात्र ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षणाचे केंद्र ठरली. परंपरेनुसार, महिलांनी समोरासमोर ‘फाटी’ (रांगा) धरल्यानंतर दोन स्त्रियांनी पती-पत्नीची वेशभूषा साकारली. वराची वाजत-गाजत मिरवणूक वाड्यातून देवघराकडे आली. तुळशीवृंदावनापाशी ही वरात विसावल्यानंतर ‘दानोषा’चा विधी पार पडला. यावेळी,

​”रुखवात कर्तलेगे सुंदरी, झेंडे बसले बरोबरी, असे झेंडे उतावळी, लाडू उचलले वरचेवरी…” यांसारख्या पारंपरिक ओव्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. मांडवावर या पती-पत्नींचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला आणि शिवकळा असलेल्या देवीकडून भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला.

​पिंगळी आणि श्रद्धाभक्तीचा संगम
​उत्सवाच्या पहाटे एका महिलेने ‘पिंगळी’चे रूप धारण करून घरोघरी जाऊन दान गोळा केले. त्यानंतर सकाळी वाड्यातील सर्व मंडळी एकत्र जमली. ज्या स्त्रियांना अपत्यप्राप्तीची ओढ आहे, अशा स्त्रियांनी श्रद्धेने मांडावर शेणाच्या तुळशीत हळद-दुधाचे मिश्रण अर्पण केले. यावेळी देवीच्या रूपाने त्यांना आशीर्वाद देण्यात आले. हा भावनिक सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. विशेष म्हणजे, ओटीत मिळालेला नारळ फक्त त्या दांपत्यानेच खाण्याचा नियम पाळून या विधीची सांगता झाली.

​पुढच्या वर्षाची ओढ अन् हुरहुर
​सावंतवाडीच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पाहुण्यांनी या उत्सवासाठी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या शेवटी, तुळशीची ‘पडली’ सन्मानाने देवघरात नेऊन ठेवण्यात आली. आता वर्षभर या पडलीला कुणीही स्पर्श करणार नाही. गेल्या सात दिवसांपासून स्त्रियांच्या गाण्यांनी, नृत्यांनी आणि गजालांनी गजबजलेला तो ‘मांड’ आता शांत झाला आहे. मात्र, या सांगतेने महिलांच्या मनात एक हुरहुर निर्माण केली असून, आता सर्वांना प्रतीक्षा लागली आहे ती पुढच्या वर्षीच्या धालोत्सवाची!