राजापूर (वार्ताहर): तिन्ही फॉरमॅट मध्ये क्रिकेट खेळले जात आहे ही अत्यंत चांगली बाब असून प्रत्येक खेळाडुने या सर्व प्रकारामध्ये जुळवून घेऊन खेळले पाहिजे. भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अजूनही कसोटी क्रिकेट मध्ये खेळले पाहिजे होते अशी स्पष्ट भूमिका भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी राजापूर येथे मांडली. लॉर्ड्स वर(इंग्लंड )झळकावलेल्या तीन शतकांमध्ये १९८६ साली केलेल्या नाबाद १२६ धावांची शतकी खेळी सर्वात महत्वाची वाटते कारण त्यावेळी प्रथमच लॉर्ड्स वर भारताने कसोटीत विजय संपादन केला होता.ती बाब देशासाठी अभिमानाची होती असा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजापूर या आपल्या जन्मभूमीला वेंगसरकर यांनी गुरुवारी भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजापूर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, सल्लागार महेश शिवलकर, सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर, सदस्य संतोष मोंडे, राजेंद्र जोंगले, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
राजापूरमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यावेळचे बालपण कसे होते. याचा पटच त्यांनी उलगडला. आपल्या जन्मापासून इथे झालेले शिक्षण तो कालखंड उलगडताना आजूबाजूला असलेले शेजारी यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. राजापूर शहरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात महादेव कुलकर्णी हे वेंगसरकर यांचे नात्याने मामा असल्याने त्यांच्या आजोळच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या. वेंगसरकर यांच्या समवेत महाराष्ट्र क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, मिलिंद कुलकर्णी आदी सहकारी गुरुवारी राजापूर मध्ये आले होते.
राजापूर मध्ये आल्यावर वेंगसरकर यांनी प्रथम आपल्या जन्मस्थानावर जावून आजूबाजूला फिरून भरपूर फोटो घेतले. त्यावेळी त्याची चौकशी सुरु होती. त्यानंतर बालपण जेथे गेले त्या इमारतीत सध्या कार्यरत असलेल्या लोकमान्य सहकारी सोसायटीच्या कार्यालयात बसून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये मोठा फरक झाला आहे. पूर्वी क्रिकेटध्ये पैसा नव्हता त्यामुळे नोकरीं सांभाळून क्रिकेट खेळावे लागत होते. मात्र अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये मोठया प्रमाणात पैसा आला आहे त्यामुळे क्रिकेट मध्ये करिअर करणाऱ्या खेळाडूला चांगली संधी असल्याचे वेंगसरकर यांनी नमूद केले.अलीकडेच महिलांनी विश्वजेते पद मिळविले होते. त्याबाबत गौरवोदगार वेंगसरकर यांनी काढले. महिलांना सुध्दा क्रिकेटमध्ये चांगली संधी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन मधील लॉर्ड्सच्या मैदानावर सलग तीन कसोटी शतके झळकवणारे वेंगसरकर हे एकमेव भारतीय फलंदाज आहेत.त्यांनी केलेल्या तीन शतकांमध्ये आवडते आणि महत्वाचे शतक कोणते होते असे विचारले असता त्यांनी १९८६ साली लॉर्ड्स वर केलेल्या नाबाद १२६ धावांची आठवण करून दिली. कारण त्या शतकीय खेळीने भारताला लॉर्डवर पहिला विजय संपादन करता आला होता.आपली शतकीय खेळी देशाला विजयी करून गेली ते मोठे समाधान असल्याचे वेंगसरकर यांनी नम्रपणे सांगितले. टी , ट्वेंटी क्रिकेटचा कसोटी क्रिकेटवर परिणाम झाला आहे का असे विचारले असता तसे काही नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाणे ही चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक खेळाडूने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जुळवून घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेटचे अलीकडचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे क्रिकेटला मोठे योगदान असून त्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये अजून खेळले पाहिजे अशी भावना माजी कर्णधार वेंगसरकर यांनी व्यक्त केली.आजोळी आलेले भारतीय माजी कर्णधार वेंगसरकर भरभरून आठवणी सांगितल्या
Home महत्वाच्या बातम्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अजूनही कसोटी क्रिकेट मध्ये खेळलायला हवे...









