श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी संपन्न झाले. या सोहळ्याला ॲड. शामराव सावंत, श्री. जयप्रकाश सावंत, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांचा विज्ञान विषयातील विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना काकतकर यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत देश शास्त्रज्ञांच्या बळावर महासत्ता होत असून विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. व्ही. पी. सोनाळकर यांनी प्रास्ताविक केले.
प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी प्रदर्शनाचे महत्त्व विशद करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. एस. मर्गज यांनी केले, तर आभार प्रा. व्ही. पी. राठोड यांनी मानले.

​हे विज्ञान प्रदर्शन ९ आणि १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असून, परिसरातील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.