खेड (प्रतिनिधी) : एमव्हिटीव्ही सहकारी पतपेढीच्या स्थापनेनंतर प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून सौ. जागृती गांगण यांची निवड होऊन इतिहास घडला आहे. सन १९९५ पासून पतपेढीच्या संचालक मंडळात कार्यरत असलेल्या गांगण यांनी महानगरपालिकेत नोकरी सांभाळताना संचालक पदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे आणि कुशलतेने पार पाडली. डेप्युटी सुपरिटेंडंट पदावरून निवृत्त झालेल्या गांगण यांची कार्यशैली, जनसंपर्क आणि नेतृत्वगुण यांची दखल घेत प्रथम त्यांची सेक्रेटरी, त्यानंतर उपाध्यक्ष आणि आता अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या कार्यकाळात एमव्हिटीव्ही सहकारी पतपेढीच्या प्रगतीला मोठी गती मिळाली असून शाखाविस्ताराची घोडदौड सुरू आहे. पतपेढीला महाराष्ट्रभर शाखा विस्तारासाठी मंजुरी मिळाल्यानंतर संस्थेने राज्यातील विविध ठिकाणी विस्तार मोहीम गतिमान केली आहे. सध्या चार शाखा कार्यरत असून लवकरच पनवेल आणि कोल्हापूर येथे नव्या शाखा सुरु होणार आहेत. पतपेढीचे एकूण सभासदसंख्य ६०,००० असून संस्थेचा मिश्र व्यवसाय ३२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आगामी काळात ५०० कोटी रुपयांचा व्यवसायिक टप्पा गाठण्याचे ध्येय संस्थेने निश्चित केले असून सभासदांना दरवर्षी नियमितपणे १२ ते १५ टक्के लाभांश दिला जात आहे.
अध्यक्षपद स्वीकारताना सौ. जागृती गांगण यांनी व्यक्त केलेल्या भावना उत्साहवर्धक होत्या. “नव्या जबाबदारीचा आनंद आहे. संस्थेचा व्यवसाय अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असे त्यांनी मनोगतात सांगितले.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सन २०१७ पासून १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कोंकणस्थ (सं.) वैश्य समाजाच्या पहिल्या महिला चिटणीस म्हणून त्या कार्यरत आहेत. ‘वैश्य विजय’ या मासिकाच्या संपादिका म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून समाजकारण आणि संघटन कौशल्याची दखल घेतली जात आहे.
व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कुटुंबाची कर्तव्येही समर्थपणे पार पाडली आहेत. त्यांच्या यशामागे पती जयवंत गांगण यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या दोन्ही मुली उच्च पदांवर कार्यरत असून परिवाराने दिलेला पाठिंबा त्यांच्या कर्तृत्वाला बळकटी देणारा ठरला आहे.
सौ. जागृती गांगण यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या वैयक्तिक कार्याची पावती असण्यासोबतच महिला नेतृत्वाच्या सशक्तीकरणाचे प्रतीक ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे एमव्हिटीव्ही सहकारी पतपेढी नव्या शिखरांकडे वाटचाल करेल, असा विश्वास सभासद आणि समाजबांधवांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी विविध स्तरांतून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












