जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये लांजा नं. १ शाळेचे सुयश

१२ वर्षाखालील मुलांचा कबड्डीचा संघ जिल्हास्तरावर अजिंक्य

लांजा (प्रतिनिधी) :डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद शाळा लांजा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. तर शाळेच्या १२ वर्षाखालील कबड्डीचा मुलांच्या संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावले आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सन २०२५ – २६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच डेरवण येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये पीएमश्री जिल्हा परिषद शाळा लांजा नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे.
प्रशालेचा १२ वर्षाखालील मुलांच्या कबड्डीचा संघाने जिल्हास्तरावर लांजा तालुक्याचे नेतृत्व करताना गुहागर व दापोली या संघाना पराभूत करून लांजा संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. अंतिम फेरीत मंडणगड संघाला पराभूत करून शाळेच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले.
तसेच शाळेतील कु. सनीदेओल राजू पासवान याने गोळाफेक क्रीडाप्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व विदयार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक श्री. विघ्नेश गुरव यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य , शाळेचे सर्व शिक्षक , पालक यांनी अभिनंदन केले आहे.