खेड (प्रतिनिधी) :– लायन्स एज्युकेशन सोसायटी संचालित एल.टी.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षा आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांनी भूषवले. यावेळी परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, समन्वयक जॉय सर, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कुडाळकर, शिक्षक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. जॉय सर यांनी प्रास्ताविक करताना शाळेची शैक्षणिक कामगिरी, चालू उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर खेड नगरपरिषदांच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला यांचा सत्कार अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सौ. माधवी बुटाला, सौ. वैभवी खेडेकर, श्री निकेतन पाटणे, श्री आरिफ मुल्लाजी आणि श्री सतिश चिकणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांना दिले जाणारे संस्कार, शिस्तबद्ध वातावरण आणि विविध उपक्रमांची प्रशंसा करत त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समारोपाप्रसंगी मुख्याध्यापक सारंग सर यांनी सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे, पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. उत्साहात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे शाळेचा गौरव अधिक वाढला असून आगामी काळात शाळा आणि नगरपरिषद यांचे संयुक्त उपक्रम अधिक गतिमान होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












