आठ दिवसांत यंत्रसामग्री सुरू करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; प्रशासनाला भाजपचा इशारा
खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, बंद पडलेली यंत्रसामग्री, शवागृहातील शीतपेटीची दुरवस्था आणि सर्वसामान्य रुग्णांना होत असलेल्या गैरसोयींबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सगरे यांना जाब विचारत प्रशासनावर जोरदार टीका केली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देत, या कालावधीत यंत्रसामग्री कार्यान्वित झाली नाही आणि आवश्यक उपाययोजना झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत रुग्णालयातील बंद यंत्रसामग्री सुरू करण्याचे तसेच डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांनंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी संजय आखाडे यांनी, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या लेखी आश्वासनांवर यापुढे विश्वास ठेवायचा की नाही, असा थेट प्रश्न डॉ. सगरे यांना विचारला. शंभर बेडच्या या रुग्णालयात केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आणत, “दोन डॉक्टरांच्या जीवावर १०० बेडचे रुग्णालय कसे चालणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रुग्णालयाबाहेर केवळ दोनच डॉक्टर उपलब्ध असल्याने मर्यादित रुग्णांची तपासणी होईल, असा फलक लावण्याची वेळ आली आहे का, अशी टीकाही त्यांनी केली. डॉ. सगरे यांच्याकडे कळंबणीसह मंडणगड आणि दापोली रुग्णालयांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातील केवळ तीन दिवस कळंबणी येथे उपलब्ध असतात, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदूजी) साळवी यांनी, “तुम्ही तुमची प्रॅक्टिस आटोपल्यानंतरच रुग्णालयात येता. तोपर्यंत एखाद्या गरोदर महिलेने आपला जीव धोक्यात घालायचा का?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर डॉ. सगरे यांनी आपण कोणतीही खाजगी प्रॅक्टिस करत नसून दापोलीतील दवाखाना आपल्या पत्नीचा असल्याचे स्पष्ट केले.
तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी शंभर बेडच्या सरकारी रुग्णालयाची जबाबदारी सांभाळताना खाजगी प्रॅक्टिसबाबत प्रश्न उपस्थित केला. तर संजय आखाडे यांनी, “एखादी महिला प्रसूतीसाठी आपत्कालीन स्थितीत दाखल झाली तर तिला डॉक्टर येईपर्यंत तीन तास थांबण्यास सांगायचे का?” असा सवाल केला. यावर डॉ. सगरे यांनी “रुग्णालयातील सिस्टर्स डिलिव्हरी करतात,” असे उत्तर दिल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जर सिस्टर्सच प्रसूती करणार असतील तर डॉक्टरांची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. एखाद्या माता किंवा नवजात बालकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील शवागृहातील शीतपेटीचा मुद्दाही ऐरणीवर आला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शीतपेटी बंद असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. गटनेते तथा नगरसेवक रहीम सहीबोले यांनी, “शीतपेटी महिनोनमहिने बंद असेल तर मृतदेह ठेवायचे कुठे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. यावर डॉ. सगरे यांनी मशीन दुरुस्तीनंतर पुन्हा बंद पडल्याचे सांगत त्याचा आवश्यक भाग पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. रहीम सहीबोले यांनी प्रशासनाला धारेवर धरत काही महिन्यांपूर्वी स्वतः पुढाकार घेऊन शीतपेटी सुरू करून घेतली होती, मात्र अलीकडील दुर्घटनेनंतर ती पुन्हा बंद पडल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या रुग्णालयात केवळ दोन डॉक्टर असून त्यांचाही शेवटचा दिवस असल्याचे सांगत, यापुढे रुग्णसेवा कशी चालविणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सध्या रुग्णालयात १८ रुग्ण उपचार घेत असून रुग्णसंख्या वाढल्यास केवळ दोन डॉक्टर सर्वांना सेवा कशी देणार, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी, “तुमच्या पत्रांची दखल घेतली जात नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही थेट मुख्यमंत्री स्तरावर हा विषय मांडू,” असे सांगितले. यावर डॉ. सगरे यांनी वेळोवेळी अतिरिक्त डॉक्टर, कर्मचारी व आवश्यक यंत्रसामग्रीसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मात्र आपल्या मागण्यांकडे वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत पुढील आठ दिवसांत रुग्णालयातील बंद यंत्रसामग्री सुरू करावी, रिक्त पदे भरण्याबाबत ठोस कार्यवाही करावी आणि रुग्णसेवा सुरळीत करावी, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना होत असलेल्या गैरसोयींबाबत आयोजित या भेटीदरम्यान जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष नंदूजी साळवी, गटनेते तथा नगरसेवक रहीम सहीबोले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, स्वराज गांधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.












