प्राथमिक शिक्षिका व नवोदित लेखिका मृगया मंगेश मोरे यांच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न

लांजा ( प्रतिनिधी) लांजा येथील प्राथमिक शिक्षिका आणि नवोदित लेखिका मृगया मंगेश मोरे यांच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच रत्नागिरी येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, न्यायाधीश सुरज मोरे, बालभारती पुणे विशेषाधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे , डाएट रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, झी मराठी हास्य कलाकार श्रीकांत ढालकर, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, लेखिका मृगया मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मृगया मोरे यांनी लिहिलेल्या ‘मनाच्या हिंदोळ्यावर’, ‘मनाच्या तळ्यावरती’ हे ललित लेखसंग्रह तसेच ‘आजीच्या कुशीतल्या गोष्टी’, ‘अमुक तमुक गोष्टी’ हे बाल तात्पर्य कथासंग्रह आणि ‘चिमुकल्यांच्या लेखणीतून’ हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता यांचा संग्रह अशा एकूण पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मृगया मोरे यांनी आजवर नवोपक्रम, कृती संशोधन, शैक्षणिक नियतकालिके, निबंध इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये विपुल लेखन केले आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकांत ढालकर यांनी मृगया मोरे यांचे लेखन म्हणजे ‘जुन्या नव्यांचा समन्वय साधण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न असल्याचे’ प्रतिपादन केले.तर बालभारती विशेषाधिकारी डॉ.लोळगे यांनी ‘विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी लिहिते व्हा’ असा संदेश आपल्या मनोगतातून दिला.
उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाला शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, मोरे व यादव परिवार, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले तर आभार मंगेश मोरे यांनी मानले