विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत पदवीधर शिक्षक गौरव नाईक राज्यात प्रथम

▪️शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र – पुणे यांचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र – पुणे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून जि. प. शाळा कुडाळ कविलकाटे चे पदवीधर शिक्षक श्री गौरव शंकर नाईक हे प्रथम क्रमांकाने विजेते झाले आहेत. यासाठी त्याच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय विज्ञान व गणिताचा जादूगार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

तालुका, विभाग व राज्य असे या स्पर्धेचे तीन स्तर होते. गौरव नाईक यांनी मांडलेले विज्ञान व गणितातील जादूचे प्रयोग कुडाळ तालुक्यातुन प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले व त्यांची निवड कोल्हापूर विभागामार्फत होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली. सातारा येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय स्पर्धेतही श्री गौरव नाईक हे विजेते ठरले व त्यांची निवड जिल्हा नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील आठ शैक्षणिक विभागातील विजेते ठरलेल्या तब्बल चाळीस स्पर्धकांचा समावेश होता. या चाळीस स्पर्धकांशी झालेल्या स्पर्धेतून गौरव नाईक यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शिक्षक गौरव नाईक यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर तयार केलेले विज्ञान व गणिताच्या जादूचे शैक्षणिक प्रयोग हे विशेष लक्षवेधी ठरले. अत्याधुनिक ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर, क्यू आर कोड चा वापर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर चा समावेश, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस व कृतीशीलतेस चालना देणाऱ्या स्वनिर्मित कृती, बुद्धीस आव्हान देणारे मजेशीर खेळ इत्यादी अनेक अशी शिक्षक नाईक यांच्या या शैक्षणिक प्रतिकृतीची वैशिष्ट्ये होती.

मूळ पेंडूर गावचे सुपुत्र असलेले शिक्षक गौरव नाईक यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीची सुरुवात मालवण येथील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या हायस्कुल मधून सहाय्यक शिक्षक म्हणून केली यानंतर जि. प. केंद्र शाळा मठ नं. एक, तालुका वेंगुर्ला येथेही त्यांनी अध्यापनाचे कार्य केले सध्या ते जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कुडाळ कवीलकाटे येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शैक्षणिक प्रवासात त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत यश संपादन केले आहे.

शिक्षक गौरव नाईक यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. निलीमा नाईक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, अधिव्याख्याता संदीप पवार, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख महेश परुळेकर, मुख्याध्यापिका श्रीम. माधुरी राणे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी अभिनंदन केले.