निरबाडे फाटा ते काडवली फाटा पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाला वेग!

दुसरीकडे पाली पाटा ते निरबाडे फाटा पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
वाहन चालक त्रस्त; प्रशासनाचा हलगर्जीपणा

चिपळूण (प्रतिनिधी):– तालुक्यातील निरबाडे फाटा ते काडवली फाटा पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पाली फाटा ते निरबाडे फाटापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

निरबाडे मार्गे काडवलीसह धामणंद पंधरागावकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र, पाली फाटा ते निरबाडे फाटा पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यात वाहने आढळून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आता तर ‘हा रस्ता खड्ड्यात की रस्ता खड्ड्यात’ अशी अवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे चुकवताना वाहन चालकांची कसरत होत आहे. प्रसंगी अपघात देखील घडले आहेत. रस्त्यातील खडी, ग्रिटने आपले डोके वर काढले असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. यातून धूळ देखील उडत असल्याने दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.

*प्रशासनाचा हलगर्जीपणा!*

याबाबत येथील ग्रामस्थांसह वृत्तपत्रांमधून आवाज उठवल्यानंतर गेल्या महिन्याभरापूर्वी या रस्त्याच्या देखभाली संदर्भात निविदा काढण्यात आली होती. मात्र, एका ठेकेदाराने प्रमाणापेक्षा निविदा कमी दराने भरल्याने फेरनिविदा काढण्यात आली .मात्र, पुढील अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार? असा सवाल येथील ग्रामस्थांसह वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याचे देखभाल असो अथवा डांबरीकरण असो याबाबत प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*निरबाडे फाटा ते काडवली फाटा पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाला वेग*

तर दुसरीकडे निरबाडे फाटा ते काडवली फाटा पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाला वेग आला असून हा मार्ग सुखकर होणार आहे. याचबरोबर काडवली – निरबाडे गावाला जोडणाऱ्या नदीवर असलेल्या पुलाची रेलिंग महापुरात तुटली होती. आता या रेलिंगचे देखील काम करण्यात आले असल्याने पुढील धोके टळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम केले जात असून येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे पाली फाटा ते निरबाडे फाटा पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून त्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे.