स्व. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ ‘खेर्डीचा राजा’ गणेश मित्रमंडळाचा उपक्रम
१२० स्पर्धकांना प्रवेश
चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डीचा राजा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ, खेर्डी-चिपळूण यांच्या वतीने स्व. सौ. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ चिपळूण तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २० सप्टेंबर रोजी खेर्डी-विठ्ठलवाडी येथे ही स्पर्धा रंगणार असून, शालेय विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील बुद्धिबळपटूंना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन खेर्डीचा राजा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले असून, श्री. व सौ. रश्मी प्रविण सावर्डेकर यांच्या प्रतिरंग चेस ॲकॅडमी, मार्कंडी-चिपळूण यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेचे स्थळ श्री. दशरथ दाभोळकर यांच्या घरासमोरील पटांगण, खेर्डी-विठ्ठलवाडी, चिपळूण हे आहे. स्पर्धकांनी सकाळी ९.३० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक असून, उद्घाटन समारंभानंतर सकाळी १० वाजता पहिली फेरी सुरू होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार असून, प्रत्येक खेळासाठी १० मिनिटे + ५ सेकंद इन्क्रिमेंट असा टाइम कंट्रोल राहणार आहे. विविध गटांसाठी आकर्षक बक्षिसे इयत्ता १ ली ते ७ वी गटात प्रथम क्रमांकासाठी १,००१ रुपये, द्वितीय ७०१, तृतीय ५०१, चतुर्थ ३०१ आणि पाचव्या क्रमांकासाठी २०१ रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इयत्ता ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांकासाठी १,५०१ रुपये, द्वितीय १,००१, तृतीय ७०१, चतुर्थ ५०१ आणि पाचव्या क्रमांकासाठी ३०१ रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी २,५०१ रुपये, द्वितीय १,५०१, तृतीय १,००१, चतुर्थ ७०१ आणि पाचव्या क्रमांकासाठी ५०१ रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत चार उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असून, सर्वात लहान मुलगा, सर्वात लहान मुलगी, उत्कृष्ट महिला खेळाडू आणि वयस्कर खेळाडू यांना प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. १२० स्पर्धकांनाच प्रवेश स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये असून, प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १२० स्पर्धकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. स्पॉट एन्ट्री स्वीकारली जाणार नाही. इच्छुक स्पर्धकांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश शुल्क GPay करून त्यानंतर आपले नाव WhatsApp द्वारे कळविणे आवश्यक आहे. स्पर्धास्थळी खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, स्पर्धकांनी स्वतःची वॉटर बॉटल सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेदरम्यान गैरवर्तन अथवा आयोजक व पंचांची दिशाभूल केल्यास संबंधित खेळाडूला स्पर्धेतून किंवा उर्वरित फेऱ्यांमधून वगळण्याचे सर्वाधिकार मुख्य पंचांकडे राहणार आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रविण सावर्डेकर (७७७५०६२५११) आणि शशांक भिंगारे (९०११८३४४९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. बुद्धिबळ या बौद्धिक खेळाला प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला चिपळूण तालुक्यातील शालेय विद्यार्थी, पालक आणि बुद्धिबळप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खेर्डीचा राजा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













