७ हजार खर्च ३५ हजार नफा!
कष्टाची तयारी अन् सातत्य हेच सोहनी बंधुचे यश!- किशोर राणे

निसर्गाचा लहरीपणा.. शेती ,बागायती करायची तर जंगली श्वापदे, अन माकड अन् केडल्यांचा धुमाकूळ यात फायद्यापेक्षा नुकसानच अधिक…त्यातून मार्ग काढत उत्पन्न घ्यायचे तर टेहळणी, निगराणीत प्रचंड मनस्ताप सहन करण्याची शेतकऱ्यांची कसरत.. यामुळे दिवसेंदिवस शेती करणे अवघड बनत चाललं आहे. यात हरकुळ बुद्रूकच्या सोहनी बंधूंनी निसर्गाच्या परिणामाला फाटा देत, हुकमी भाव देणारी रेशीम शेतीची कास धरली. कष्टाला यश मिळत गेले अन गावात राहून काय करायचे? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणाऱ्या युवाशक्ती समोर दिपस्तंभ उभा केला आहे. कष्टात सातत्य अन आपल्या कामाशी निष्ठा असेल तर गावात राहूनही शहरापेक्षा जास्त पगार मिळवू शकतो. अनेकांना रोजगार देवू शकतो. हा विश्वास ध्येयवेड्या जयदिप आणी ओंकार या तरुणांनी दिला आहे. गेल्या सहा वर्षापासून ते ही शेती करत आहेत. अन प्रत्येकवर्षी नफ्यात वाढ होत आहे…
कोरोना काळाने अनेकांच्या आयुष्यात अनेक उलथापालथ घडविली. या संक्रमणाच्या फेऱ्यात सोहनीबंधूही अडकले… मुंबईत नोकरी करत असलेले हे बंधु गावी परतले. गावाकडच्या शेतीत काय करता येईल याच्या शोधात असलेल्या या युवकांना आपल्या भरड्या जमिनीवर पावसाळ्यातील भातपिका व्यतिरिक्त काहीच करत नसल्याचे लक्षात आले. या जागेवर रेशीम शेती करायची हे ठरवून त्याची माहीती घेत आपल्या शेतात तुतीची लागवड केली. यावेळी गावकरी त्यांना हसायचे… अशी लागवड करुन काय होणार? यात फायदा तो काय? अनेक प्रश्न उभे केले. काही संकटे समोर आली,पण या युवकांनी मागे हटायचे नाही म्हणत आपले प्रयत्न सुरुच ठेवले.जयदिपने तर तुती शेती करणाऱ्या बीडवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जात पडेल ती कामे सुरु केले. जेणेकरुन प्रत्यक्ष अनुभव मिळत गेला. सहा महिने प्रॅक्टीकल शिकुन घेत आपल्या शेतात त्यावर्षीच्या पावसाळ्यात तुती लागवडीचा पहिला मुहूर्त केला. पारंपरिक शेतीतील अनिश्चित उत्पन्न, वाढता खर्च आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यांचा विचार करून सोहनींनी आधुनिक पण स्थानिक परिस्थितीला साजेसा असा हा उपक्रम सुरू केला.
तुतीची बाग तयार झाली आता पुढचे पाऊल
तुतीची बाग तयार झाली काड्यांची रोपे झाली.. आता शेतातच हरकुळच्या कांबळेवाडीत एक फार्म उभे केले. श्री कोटेश्वर तुती रेशीम फार्म! २०२० पासून रेशीम फार्म सुरु झाला. स्ट्रक्चर उभे झाले. रेशिम किड्यांना सोडण्याचे रॅक तयार केले. कोल्हापुरातून अंडीपुंज खरेदीकरुन पहिली बॅच सुरु केली. रेशीम अंडीपुंजातून बाहेर आल्यानंतर रेशीम किडा, पाच अवस्थेतून जातो. या संक्रमणात ४ ते ५ आठवडे जातात. नंतर पुढची पायरी.. तयार झालेला किडा साधारणत: २६ ते २७ दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी करते आणि तोंडावाटे सिल्क धागा सोडण्यास सुरुवात करते. या अळया कोष निर्मितीकरिता प्लास्टीकच्या चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेशीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते आणि कोष बनविण्याची प्रक्रिया ४ ते ५ दिवसात पूर्ण होते. कोषावर आलेली अळी जवळपास १००० ते १२००० मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टीक चंद्रिकेवर ४०० ते ५०० कोष तयार होऊ शकतात. एका कोषाचे वजन साधारणतः १.५ ते २.५ ग्रॅम असते. १०० अंडीपुंजापासून कमीत कमी १० किलो कोष मिळतोच.आपण किती अंडीपुंज विकसीत करतो यावर आपला फायदा ठरलेला…रेशिम किडे अंड्यातून बाहेर येऊन अळी होइपर्यंत नियमित काळजी घेतली की यश शंभर टक्के ठरलेले. असे जयदिप सांगतात.
फायद्याचे गणित..
रेशीम शेतीत आपण किती मेहनत घेणार आहोत? आपले घरातील सहकारी आपल्याला कसे आणी किती कालावधीत मदत करणार यावर यशाची मात्रा ठरलेली. मजुरीवरील खर्च कमी केल्यास मोठा फायदा. कामे अगदीच साधी सोपी असतात. पण लक्षपुर्वक करायची. लहान बाळाप्रमाणे किडयांचे संगोपन करायचे…त्यांना तुतीची पाने बारीक चिरुन द्यायची. हे काम वक्तशीरपणे व्हायला हवे. आमची आई ही सारे अगदी निगुतीने हे पुर्वी करायची…अगदीच लहान असलेल्या म्हणजे १ दिवसाच्या किड्यांना अधीक नाजूक पाने … अधीक बारीक करुन तर चार पाच आठवडे झालेल्या मोठ्या किड्यांना मोठी पाने…हे खाद्ये ठरलेले. (अलीकडेच आई देवाघरी गेली) किड्यांचा अळीपर्यंतचा प्रवास थोडासा संवेदनशील मग पुढचा टप्पा सोपा…रेशीम किडे संवर्धनाबाबत प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी कृषी विभाग, रेशीम संचालनालय तसेच ऑनलाइन प्रशिक्षणांचा अभ्यास केला. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने तुती लागवड केली आणि त्यानंतर रेशीम किड्यांचे संगोपन सुरू केले. स्वच्छता, तापमान नियंत्रण, योग्य आहार आणि वेळेवर निगा राखणे या बाबींवर विशेष भर दिल्यामुळे पहिल्याच टप्प्यात समाधानकारक उत्पादन मिळाले.
सोहनी बंधू फायद्याचे गणीत सांगताना म्हणाले, रेशीम अंडी १०० याला साधारण १४००रुपये खर्च, चुना १० किलो- २०० रुपये, विजेता ४ किलो-३२० रुपये अन आपल्याला हे सारे कोल्हापुर अथवा कर्नाटकात जावून खरेदी करावे लागत असल्याने वाहतुक खर्च ५००० रुपये. म्हणजे ६ हजार ९२० रुपये खर्च. १०० अंडीपुंजा पासून कमीत कमी ७० किलो कोष मिळतातच. सरासरी प्रतिकिलो ५०० रुपये (यात कोषावरच्या रेशीम नुसार किंमत वाढतेही) मग हिशोब करा.. आता अशी शेती करणारे आपल्या जिल्ह्यात गावोगावी उभे झाले विशेषत: महिला वर्ग पुढे आला तर कोष खरेदी केंद्र सिंधुदुर्गात सुरु होईल. मग आणखीनच फायदा वाढेल.
तुमच्याकडे पाणी आहे?
साधारणपणे एक एकर तुतीची लागवड केल्यानंतर ६० बाय २० च्या एका शेड मध्ये २५० ते ३०० अंडपुंज ठेवली जातात. एका महिन्यात २५० ते ३०० किलोपर्यंत कोष मिळतात.साधारणपणे एक उत्पादन घ्यायला अडीच महिन्याचा कालावधी लागतो. सिझनेबल पाणी असणाऱ्यांना किमान तीन बॅच घेता येतात. एकरी वीस हजाराचा खर्च वजा जाता अडीच लाखाचे उत्पन्न यातून मिळते.
कमी गुंतवणूक, निश्चित उत्पन्न
रेशीम किडे संवर्धन हा तुलनेने कमी भांडवलात सुरू होणारा आणि अल्प कालावधीत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. सोहनीच्या अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक चक्रात मिळणाऱ्या कोषांमुळे (cocoons) नियमित रोख उत्पन्न मिळते. रेशीम खरेदी केंद्रांशी थेट संपर्क साधून त्यांनी विक्रीची साखळी मजबूत केली आहे.
युवकांसाठी प्रेरणादायी वाट
आज अनेक तरुण नोकरीसाठी शहरांकडे वळत असताना जयदिप- ओंकार यांनी गावातच राहून स्वयंपूर्ण रोजगार निर्माण केला आहे. त्याचा हा उपक्रम केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नसून इतर युवकांना दिशा देणारा ठरत आहे. सध्या तो गावातील इच्छुक तरुणांना आणि शेतकऱ्यांना रेशीम किडे संगोपनाबाबत माहिती देतो, अनुभव शेअर करतो आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करतो. ग्रामीण भागातील युवकांनी शेतीपूरक उद्योगांकडे वळावे, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करावा आणि स्वावलंबी व्हावे, यासाठी त्यांचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. या शेतकऱ्यांशी कुणाला संपर्क करायचा असेल तर जयदीप आणी ओंकार ९०९६०१३१५१/९४०४९४४६२२ यांच्याकडे संपर्क साधावा . अथवा इमेल करा [email protected]
चौकट..१
रेशीम उद्योग फायद्याचा का आहे?
कमी भांडवल आणि जास्त नफा: इतर पिकांच्या तुलनेत रेशीम उद्योगासाठी सुरुवातीचे भांडवल कमी लागते आणि एकदा तुतीची लागवड केली की ती १० ते १५ वर्षे उत्पन्न देते.वर्षभर उत्पन्न: रेशीम कोष उत्पादन वर्षातून ५ ते ६ वेळा घेता येते, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात दर दोन महिन्यांनी पैसा खेळता राहतो.
कुटुंबातील सर्वांना रोजगाराची संधी: या कामात शारीरिक कष्ट मध्यम स्वरूपाचे असल्याने घरातील महिला आणि वृद्ध व्यक्तीही हातभार लावू शकतात.
शासकीय अनुदान: केंद्र आणि राज्य सरकारकडून तुती लागवड, कीटक संगोपन गृह (शेड) बांधणी आणि साहित्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी किंवा अनुदान दिले जाते.
हक्काची बाजारपेठ: रेशीम कोषांना (Cocoons) मागणी मोठी असून शासकीय बाजारपेठांमध्ये त्यांना चांगला हमीभाव मिळतो.
चौकट… २
उद्योगाचे मुख्य टप्पे
१. तुती लागवड: रेशीम कीटकांचे मुख्य अन्न ‘तुतीचा पाला’ आहे. दर्जेदार पाल्यासाठी योग्य जातीची तुती लागवड करणे आवश्यक असते. २. कीटक संगोपन: अंडीपुंजांपासून अळ्या बाहेर आल्यानंतर त्यांना वेळेवर पाला घालणे, शेडमधील तापमान आणि आर्द्रता राखणे महत्त्वाचे असते. ३. कोष निर्मिती: साधारण २२ ते २५ दिवसांच्या संगोपनानंतर अळ्या स्वतःभोवती रेशमी धाग्याचे वेष्टन (कोष) तयार करतात. ४. बाजार विक्री: तयार झालेले पांढरेशुभ्र कोष रेशीम मार्केटमध्ये विकले जातात.
चौकट ..३
यशासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
प्रशिक्षण: हा उद्योग सुरू करण्यापूर्वी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अधिकृत प्रशिक्षण घेणे फायदेशीर ठरते.
स्वच्छता: कीटक संगोपन गृहात कमालीची स्वच्छता ठेवावी लागते, जेणेकरून अळ्यांवर रोग पडणार नाहीत.किड्यापर्यंत मुंगी जाऊ नयेत म्हणून रॅकच्या खुराखाली ऑईल किंवा पाणी ठेवणे, ,उंदीर अथवा अन्य पक्षी जाऊ नयेत म्हणून ट्रॅप ठेवणे. अन हा व्यवसाय करताना स्वत: मालकाचे १०० टक्के लक्ष असणे आवश्यक असते.
पाण्याचे नियोजन: तुतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाल्याची गुणवत्ता आणखीन वाढते.पाण्याची बचत होते.












