कष्टाला सुंगध मातीचा…

मातीचे आरोग्य जपूया 

शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून भरघोस शाश्वत उत्पादनाकरीता शेतकऱ्यांनी शेतातील मातीचे परीक्षण करून घेणे ही अत्यंत गरजेची बाब झाली आहे. जमिनीत सतत पिके घेत असल्यामुळे तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची लागवड व सधन शेती पद्धतीमुळे जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. शाश्वत उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे अत्यंत महत्वाचे आहे. पिकांना विविध १६ अन्नद्रव्याची कमी अधिक प्रमाणात गरज असते. पिके ही अन्नद्रव्ये, हवा, पाणी जमिनीतून शोषून घेतात. भरघोस उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची गरज ही इतर अन्नद्रव्यापेक्षा जास्त असते. म्हणून पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खताद्वारे करण्यात येतो.

पिकाला ज्या प्रमाणात अन्नद्रव्याची गरज असते त्यानुसार त्याचा पुरवठा करणे ही अधिक उत्पादन मिळणाऱ्या दृष्टीने आणि शेती जिवंत राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी माती परीक्षण करून जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार तसेच अन्नद्रव्याचे प्रमाण आरोग्य पत्रिका प्रमाणे पिकांना आवश्यकतेनुसार अन्नद्रव्याचा पुरवठा करावा. यामुळे शेतकऱ्याच्या खताच्या खर्चात बचत करून शेती किफायतशीर करता येते. मातीची सुपीकता तसेच आरोग्य टिकून ठेवणे ही बाब शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

भारत सरकार व राज्य शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजना जिल्ह्याला भरीव लक्षांक देऊन जमीन आरोग्य पत्रिका वितरण योजना सन २०२५-२६ शासकीय अनुदानातून २४००० चे लक्षांक देण्यात आले आहेत. सन २०२३-२४ मध्ये ४५०० व सन २०२४-२५ वर्षी ६७२० माती नमुने लक्षांक पूर्ण केला, याचे जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरण केले. या वर्षी ६७८५ जमीन आरोग्य पत्रिका तपासणी पूर्ण झाली. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील प्रतिनिधी स्वरुपात मृदा नमुने घेऊन प्रयोगशाळेत माती परीक्षण करून खताचा योग्य प्रमाणात वापर केला जातो. त्यामध्ये पिकांची अन्नद्रव्ये घेण्याची क्षमता मातीचा प्रकार पाहून योग्य प्रमाणात खत दिले जाते. त्यामुळे उत्पादनात वाढ दिसून येते.

जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याची माहिती शेतकऱ्यांना सांगणे ही काळाची गरज आहे. जमिनीत भरपूर अन्नद्रव्ये आहेत. परंतु शास्त्रीय दृष्ट्या विचार करता कोणत्याही पिकला लागणारी अन्नद्रव्याची मात्रा ही मृदा चाचणी करून ठरवायला हवी. कारण मृदा चाचणी नुसार जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचा पिकांना पुरवठा किती आहे त्यानुसार किती अन्नद्रव्याचा पुरवठा जमिनीत करावा याचा अंदाज शेतकऱ्यांना येतो. हा मुख्य फायदा जमीन आरोग्य पत्रिकेत आहे. मृदा आरोग्य पत्रीकेचे महत्व मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्या समन्वयातून शासन मान्य जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी सिंधुदुर्ग येथील जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा मार्फत मातीचे आरोग्य आणि माती परीक्षण द्वारे खत व्यवस्थापना सबंधित माहिती पुरविली जाते. प्रत्येक शेतकर्यांनी दर ३ वर्षांनी माती परीक्षण करून आपल्या जमिनी जमीन आरोग्य पत्रिका कृषि विभागाकडून तयार करून घ्यावी.

जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी उपाययोजना:

जमिनीचा दर्जा आणि पर्यावरण संतुलन टिकवणेसाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय खते, सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते म्हणजे शेण खत, गांडूळ खत याचा योग्य वापर करावा.

जमिनीचे उताराच्या आडव्या दिशेने मशागत करणे / समपातळीत जमिनीवर आच्छादनाचा वापर करणे.

नत्रयुक्त खते एका हफ्त्यात न देता ती दोन किंवा तीन हफ्त्यात विभागून द्यावी.

स्फुरद व पालाशयुक्त खते लावणीच्या एकाच वेळी द्यावी.

रासायनिक खते पृष्ठभागावर भोकून न देता ८-१० सेंटीमीटर खोलवर घातल्यास खताची कार्यक्षमता वाढते.

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या पाणलोट विकास कार्यक्रमाचा प्रभावीपणे वापर करावा.

आपल्याला पिढ्यानपिढ्या जमीन मिळाली आहे तिचे महत्व शैक्षणिक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी सामाजिक चळवळीतून जमिनीचे महत्व प्रसारित करावे.

जमीन वाचवा, देश वाचवा, अनमोल जमीन वाचवा, वसुंधरा वाचवा.

 

– श्रीमती वैशाली मुळे

जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, सिंधुदुर्ग

………………………………