कोकण मेव्याच्या नव्या पॅकेजमध्ये क्रांती
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना
गावाकडचा आंबा ,काजू , फणस या व्यतिरिक्त बराच मोठा कोकण मेवा आहे. जो आपल्याला आपल्या नातेवाईकांबरोबरच जगातील कोणालाही सहज देता येऊ शकतो. आमचे आमसुल असो, वा कोकम, मुठयाल ( कोकम तेल) ,मिरची असो वा विविध पीठ, मालवणी मसाला असो वा आवळा चुर्ण अशा अनेक पदार्थांना घरबसल्या आपण विक्रीयोग्य करु शकतो.
महाराष्ट्रात अन्नप्रक्रिया क्षेत्राचे राज्याच्या GDP मध्ये २.४% योगदान आहे आणि २.५ दशलक्ष लोकांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. असे असूनही या क्षेत्राला पुरवठा साखळीतील अकार्यक्षमता, वित्तपुरवठ्यात मर्यादित प्रवेश, नियामक अडथळे, गुणवत्ता नियंत्रण समस्या व कुशल मनुष्यबळाची कमतरता यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी शासनाने पायाभूत सुविधा विकास योजना आणि मुख्यमंत्री कृषी आणि अन्नप्रक्रिया योजना यासह अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
याव्यतिरिक्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजनेचे उद्दीष्ट सूक्ष्म अन्नप्रक्रिया उपक्रमांना औपचारिक व अद्यावत करणे आहे.या योजनेशी संबंधित थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे (MoFPI) संपूर्ण देशभरात राबविली जात आहे. महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण याबाबतची जबाबदारी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडे आहे.
■ योजनेचा उद्देश :-
नवीन तसेच सध्या कार्यरत असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे औपचारीकीकरण करणे.
नविन तसेच कार्यरत सुक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे विस्तारीकरण / आधुनिकीकरण/ स्तरवृद्धी करणेसाठी मदत करणे.
बेरोजगार नवयुवक, महिला, शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयं सहाय्यता समूह, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, सहकारी संस्था, भागीदारी संस्था यांना संधी उपलब्ध करून देणे.योजनेत समाविष्ट उद्योजक लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतीत प्रशिक्षित करणे.
अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे.
उत्पादनांचे बॅन्डींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
सामाईक सेवा (सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणुक, पॅकेजिंग, विपणन) तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे.
अनुदानास पात्र उद्योग: बेकरी, केळीचे चिप्स, बिस्किट, पोहा, काजू प्रक्रिया, ब्रेड/टोस्ट, केक, चॉकलेट, कोकोनट मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, दलीया, डाळमिल, एनर्जी ड्रिंक, पिठाची गिरणी, फ्रेंच फ्राय, फ्रूट ज्यूस, अद्रक-लसूण पेस्ट, ग्रेप वाईन, शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती (तेलघाणा लाकडी/यांत्रिक), हिंग, मध, बर्फाचे तुकडे, आयोडीनयुक्त मीठ, जॅम व जेली, लिंबू सरबत, नुडल्स/शेवई, सीलबंद पाणी, पाम तेल, पनीर/चीज, पापड, पास्ता, लोणचे, आलू चिप्स, राईस ब्रान तेल, सुगंधित सुपारी, सोया चंक, सोया सॉस, हळद/मसाले, शुगर कॅन्डी, सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे, इमली पल्प, टोमॅटो प्रोसेसिंग, चेरी (टूटी फ्रूटी), विनेगर आणि फळ प्रक्रिया उद्योग.
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, शिक्षणाचा दाखला, वीजबिल फोटो, मशिनरीचे कोटेशन, बँक पासबुक मागील ६ महिन्याचे, पासपोर्ट साईज फोटो, जागेचा असेसमेंट उतारा / सात बारा.
■ योजनेचे घटक :-
१) वैयक्तिक व गट लाभार्थी :
पात्र लाभार्थी – बेरोजगारयुवक, महिला, शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, सहकारी संस्था, तसेच भागीदारी संस्था.
अनुदान – मंजूर प्रकल्प किमतीच्या ३५% व जास्तीत जास्त रु.१० लक्ष.
२) सामाईक पायाभूत सुविधा :
पात्र लाभार्थी – स्वयंसहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, सहकारी व शासकीय संस्था.
अनुदान – मंजूर प्रकल्प किमतीच्या ३५% व जास्तीत जास्त रु.३ कोटी.
३) बीज भांडवल :
पात्र लाभार्थी – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) व राज्य शहरी उपजीविका अभियान (SULM) या संस्थांशी संलग्नित स्वयंसहायता समूहातील सदस्य.
अनुदान – प्रती स्वयंसहायता समूह जास्तीत जास्त रु.४ लक्ष व प्रती सदस्य रु. ४०,०००.
४) मार्केटिंग व बॅन्डींग :
पात्र लाभार्थी – स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, सहकारी व शासकीय संस्था.
अनुदान – मंजूर प्रकल्प किमतीच्या ५०% खर्चाची प्रतिपूर्ती.
५) प्रशिक्षण : जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस प्राप्त लाभार्थी तसेच बीज भांडवल प्राप्त स्वयंसहायता समूह व त्यातील सदस्य.
योजना अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. या योजनेचा लाभ घेणे व अधिक माहितीसाठी https://pmfme.mofpi.gov.in व https://krishi.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांस भेट द्या किंवा आपल्या तालुक्यातील कृषि अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा संसाधन व्यक्ति यांना संपर्क करावा.
आपल्या कोकणी मेव्याला नवी उभारी देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे केवळ वैयक्तिक उद्योजकांनाच नव्हे, तर स्वयं सहाय्यता समूह आणि शेतकरी उत्पादक संस्थांनाही आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्र राज्य या योजनेच्या अंमलबजावणीत देशात प्रथम क्रमांकावर असून, याचा लाभ घेऊन आपण आपले कृषी उत्पादन एका ब्रँडमध्ये रूपांतरित करू शकतो.
जर आपण अन्नप्रक्रिया क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा आपला सध्याचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल, तर आजच या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. या योजनेचा अॅक्ट आणि त्यातील तरतुदी समजून घेण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
– सौ. श्रेया राजाराम सामंत
(जिल्हा संसाधन व्यक्ति, सिंधुदुर्ग)
९४२१३३५९८७












