
तर शिवसेनेकडून अजय गोंदावळे रिंगणात
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडत असून, या पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेनेच्यावतीने नगरसेवक अजय गोंदावळे यांनी अर्ज सादर केला आहे. नगरपरिषदेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने हा गड भाजपच राखणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आज सकाळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. अनिल निरवडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सुपूर्द केला.
या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नीलम नाईक, वीणा जाधव, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसरीकडे, शिवसेनेनेही या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक उपस्थित होत्या.
सावंतवाडी नगरपरिषदेत सध्या भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या ॲड. अनिल निरवडेकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, शिवसेनेने अर्ज दाखल केल्यामुळे ही निवड बिनविरोध न होता आता मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.












