मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग फेरीचे यजमानपद यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटला 

सावंतवाडीत ८ ऑगस्टला रोजी रंगणार ५०० हून अधिक विद्यार्थी कलाकारांचा कुंभमेळा 

सावंतवाडी । तनया रेडकर : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग विभागीय प्राथमिक फेरीचे आयोजन करण्याची मानाची संधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडीला मिळाली असून, हा प्रतिष्ठित युवा महोत्सव शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या परिसरात पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी या महोत्सवात विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या हस्ते होणार आहे.या संदर्भातील सविस्तर माहिती यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक त्यांनी भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला विभागांतील गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज, मातीशिल्प आदी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपले कलाविष्कार सादर करणार आहेत.

सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी व कागदपत्र पडताळणी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून करण्यात येणार असून, मुख्य स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री ९.३० या वेळेत होतील. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहेत.

या विभागीय प्राथमिक फेरीतील उत्कृष्ट स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अंतिम फेरीतून निवड झालेले विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या प्रतिष्ठेच्या महोत्सवाचे यजमानपद यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटला दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी मुंबई विद्यापीठाचे आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या कार्यरत असून सर्व तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. स्पर्धकांसाठी दर्जेदार सुविधा आणि सक्षम आयोजन यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांचे या महोत्सवासाठी मार्गदर्शन लाभत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या नेतृत्वाखाली युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह, डॉ. आशिष नाईक, प्रा. स्वागत केरकर तसेच विविध समित्या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत आहेत.

प्राचार्य डॉ. रमण बाणे, युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह आणि डॉ. आशिष नाईक यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.