लांजाचा सुपुत्र रवींद्र कांबळे याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर यशाला गवसणी

लांजा-: संतोष कोत्रे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशा प्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर लांजा गावचा सुपुत्र असलेल्या रवींद्र चंद्रकांत कांबळे याने अखेर यशाला गवसणी घातली असून त्याची महाराष्ट्र सुरक्षा बल (एम एस एफ) मध्ये निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लांजा बौद्धवाडी येथील रहिवासी असलेला रवींद्र कांबळे याला सुरुवातीपासूनच पोलीस खात्याविषयी आकर्षण होते. इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण लांजा हायस्कूल आणि पदवीपर्यंतचे शिक्षण लांजा वरिष्ठ महाविद्यालय येथे झाल्यानंतर रवींद्र कांबळे याने पोलीस खात्याविषयी असलेल्या आकर्षणातून सुरुवातीला काही काळ राजापूर येथे होमगार्ड म्हणून काम केले. मात्र पोलीस खात्याविषयी असलेल्या आकर्षण त्याला स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळेच तो मुंबई येथे गेला होता. या ठिकाणी पोलीस खात्यासंबंधीत विविध परीक्षा दिल्या. काही वेळा अपयशयही पदरी आले. मात्र त्याने तो खचून गेला नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिका संघटित व्हा या ऊक्ती प्रमाणे शिक्षण झाले होतेच पण पोलीस खात्याविषयी नोकरी मिळवण्यासाठी
त्याने संघर्ष सुरू होता.
अखेर रवींद्र कांबळे याच्या या प्रयत्नाला यश आले असून त्याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झाली आहे. अशाप्रकारे बाबासाहेबांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा संघर्ष करा या उक्तीप्रमाणे त्याने प्रयत्न करत अखेर आपले स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल आई सुनीता वडील चंद्रकांत कांबळे, काका प्रकाश, काकी प्रतिमा कांबळे, भाऊ तुषार कांबळे, तसेच अनंत कांबळे दिलीप कांबळे आणि लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ लांजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट- महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झालेल्या रवींद्र कांबळे याचा मोठा भाऊ तुषार सध्या लांजा येथे वायरमन म्हणून काम करत आहे. त्याने सांगितले की रवींद्र याला लहानपणापासूनच पोलीस खात्याविषयी आकर्षण होते. आपणही एक ना एक दिवस असंच अधिकारी होणार असे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने आजवर प्रचंड मेहनत केली संघर्ष केला आणि आज त्याच्या या प्रयत्नांना यशाची झालर लाभली आहे. यामध्ये त्याची तेवढीच प्रचंड मेहनत आणि कष्ट आहेत. त्यामुळे आज आम्हाला देखील समाधान लाभल्याचे तुषार कांबळे म्हणाले.