रत्नागिरी ः प्रतिनिधी
हातखंबा-सनगरेवाडी येथून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या प्रौढाचा त्याच परिसरातील एका विहिरीत बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी मृतदेह आढळून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र गोविंद सनगरे (40,रा.हातखंबा-सनगरेवाडी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. महेंद्र सनगरे हा सोमवार 12 जानेवारी रोजी सकाळी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. याबाबत त्याचा भाउ रविंद्र सनगरे याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानुसार, महेंद्रचा सर्व ठिकाणी शोध घेत असताना बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वा.सुमारास रांभोळकरीण मंदिरासमोरील आंबा बागेतील विहिरीत तेथील कामगारांना एक मृतदेह दिसून आला. त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला असता त्याची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.










