​कारिवडे येथील ३२ वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू

​सावंतवाडी । प्रतिनिधी :

कारिवडे, सिद्धार्थ नगर येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंद यशवंत जाधव असे या मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद जाधव यांना गेल्या काही काळापासून अति मद्यपानाचे व्यसन होते. बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे जेवण केले आणि ते झोपले. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १५ जानेवारी) सकाळी ६ वाजेपर्यंत ते उठले नाहीत. घरच्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, ते निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ माजली.

​ ​या घटनेबाबत मृताचे नातेवाईक श्री. सुरेश नवसो जाधव (वय ५३ वर्ष, रा. कारिवडे सिद्धार्थ नगर) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दोरी आणि महेश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.