बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ठरू शकते अपघाताला निमंत्रण
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील तुळस घाटी येथे दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्याच्या बाजूला येऊन धोकादायक स्थितीत अडकला आहे. अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेले चार दिवसांपासून वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. काल म्हापण येथे दरड कोसळून धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे तुळस घाटी येथे वळण असलेल्या ठिकाणी दरडीचा भला मोठा दगड कोसळून रस्त्यालगत येऊन अडकला आहे. तोच दगड जर सरळ रस्त्यावर आला आणि त्यावेळी वाहतूक सुरू असली तर मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या भागात लाईट नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











