‘उभा बाजार अंगणवाडीत ‘एक तरी झाड लावा’ उपक्रम
तुळशीच्या रोपांचे वाण देत आगळावेगळा हळदीकुंकू सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : महिलांच्या समस्या निवारण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद कटिबद्ध असून, शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांना सुखी-समृद्ध करणे ही आमची प्रतिज्ञा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी केले.
सावंतवाडी उभा बाजार येथील अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने आयोजित ‘अभिनव हळदीकुंकू’ समारंभात त्या बोलत होत्या.
नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून या अंगणवाडीत प्लास्टिक किंवा वस्तूऐवजी ‘तुळशीचे रोप’ वाण म्हणून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाचे कौतुक करताना नगराध्यक्षा म्हणाल्या की, “तुळस आणि मानवी जीवन यांचे नाते अतूट आहे. भविष्यात प्राणवायूसाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे जतन केले पाहिजे.”
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले, नगरसेविका दुलारी रांगणेकर व मोहिनी मडगावकर यांचा सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर व पालकांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. यावेळी उपस्थित महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा काष्टे यांनी केले, तर ज्योती कदम यांनी तुळशीचे महत्त्व विशद केले.
यावेळी मदतनीस अमिषा सासोलकर, सरिता भिसे, पालक व शिक्षक मीना दाभोलकर, नेहा काष्टे, ज्योती कदम, स्वानंदी नेवगी, जानवी गावडे तसेच शुभांगी मेस्त्री, गीतांश मुंज, सहावी नेवगी, अथांग मातोंडकर आदी मुले उपस्थित होती.











