संतप्त जमावाने पेटवली कार…
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापुर: चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी मोठा अपघात झाला या अपघातात बाळतीण सुवर्णा कुंदेकर आणि नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात बाळंतिणीचा मृत्यू आणि अपघातास कारणीभूत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याच्या रागातून संतप्त जमावाने कार पेटवली, तसेच नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. येथील राहुल विजय कुंदेकर हे आठवड्यापूर्वी झालेली पत्नी सुवर्णा, सात दिवसाच्या नवजात बाळ, सासू व २ वर्षांचा मुलासह चारचाकी कारने (एमएच ०४ डीएन ३७४९) गडहिंग्लजहून अडकूरकडे जात होते.दरम्यान, चंदगडकडून कोल्हापूरकडे जाणा-या चारचाकी कारने (एमएच ०९ जीए ७५१५) त्यांच्या कारगाडीला कानडेवाडीनजीक धडक दिली. धडकेत कुंदेकर यांच्या कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यातील जखमी बाळंतीण सुवर्णा यांचा शुक्रवारी पहाटे उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या अडकूर ग्रामस्थांसह जमावाने नेसरी पोलिस ठाण्यावर धडक मारली.अपघातास कारणीभूत कार चालक स्वप्निल रवींद्र रानगे (रा.कोल्हापूर) याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, मृत बाळंतिणीचे पार्थिव आणि अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे पोलिस ठाण्यासमोर आणली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्यासह अडकूर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे सपोनि.आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.













