विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : येथील उभाबाजार स्थित श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरात यंदा गणपती मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३६ वा वर्धापन दिन, माघी गणेश जयंती, श्री नारायण स्वामी पुण्यतिथी आणि बालाजी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बुधवार दिनांक २१ जानेवारी ते शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ या कालावधीत यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उत्सवाची सुरुवात बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता श्रींच्या पूजाअर्चेने होईल. यावेळी मूर्ती प्रतिष्ठापना वाढदिवसानिमित्त गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने, जप आणि हवन पार पडणार आहे. रात्री स्थानिक भजनी मंडळाचे भजन होणार आहे.
गुरुवार, २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीचा मुख्य सोहळा रंगणार आहे. सकाळी अभिषेक व पूजाअर्चा झाल्यानंतर १०:३० वाजता ‘गणेश जन्मावर’ कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता मंगलमयी वातावरणात ‘गणेश जन्म सोहळा’ साजरा केला जाईल. त्यानंतर दुपारी १२:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंड नामजप व रात्री ९ वाजल्यानंतर भजन होईल.
शुक्रवार, २३ जानेवारी रोजी श्री नारायण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी स्वामींची समाधी व पादुका पूजन करण्यात येईल. सकाळी ११ वाजता ‘पावणी’ कार्यक्रम होईल, त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचा सांगता दिवस शनिवार, २४ जानेवारी रोजी असेल. या दिवशी बालाजी मठात श्रींची पूजाअर्चा, अभिषेक आणि स्वामींचे समाधी पूजन करण्यात येईल. रात्री भजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दैवज्ञ गणपती मंदिर उत्सव समिती, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












