सावंतवाडी | प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात भेट देत भक्तिमय वातावरणात वारकरी परंपरेचा अनुभव घेतला. वारकरी वेशभूषा, हातात टाळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि डोळ्यांत भक्तिभाव अशा रूपात विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात भक्तिरसाची अनुभूती घेतली.
यावेळी मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन नामस्मरण केले तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरेविषयी माहिती जाणून घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा तसेच भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली.
या प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य आबा केसरकर, सचिन मळीक, हेमंत केसरकर आणि सुमित वाडकर उपस्थित होते. शाळेच्या उपप्राचार्या अवंतिका नाईक तसेच प्राची परब, निधी सावंत, महिमा चारी, दिनेश जाधव, मयुरी ठाकूर आणि अस्मिता परब या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रम यशस्वी केला.













