सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा 

निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्र. ३, अंधेरी, मुंबई, विवेक बसवंतराव घोडके यांनी आज सावंतवाडी शहराला भेट दिली.

विवेक घोडके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक तयारीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली आणि निवडणूक यंत्रणांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, विविध विभागांशी संवाद साधून आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.

या दौऱ्यात त्यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी स्ट्राँग रूम आणि मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी केली. निवडणुकीसंदर्भातील नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि साहित्य उपलब्धता या महत्त्वाच्या बाबींवर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी निरीक्षक घोडके यांनी टोपीवाला स्मारक तंत्रशाळा, तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मिलाग्रीस हायस्कूल, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा नं. ४, काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच, उपरलकर देवस्थान येथील स्थिर सर्वेक्षण पथकाचीही तपासणी केली.

सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया पारदर्शक, सुयोग्य आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी दिले.