चालू आर्थिक वर्षात ४ कोटींचा ढोबळ नफा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सहकार क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभारामुळे आणि विश्वासार्हतेमुळे लौकिक प्राप्त केलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग या संस्थेने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये यशाचे नवे शिखर सर केले आहे. संस्थेने यंदा ४३० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय पूर्ण केला असून, जिल्ह्याच्या आर्थिक नाडीवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. विशेष म्हणजे, या वर्षात संस्थेला ४ कोटी रुपयांचा ढोबळ नफा (ग्रॉस प्रॉफिट) झाला असून, सहकार चळवळीत संस्थेने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद मानली जात आहे.
३०० हून अधिक कुटुंबांना रोजगाराचा आधार
सैनिक नागरी पतसंस्थेचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात विस्तारलेले असून सध्या एकूण २० शाखांमार्फत कामकाज सुरू आहे. या माध्यमातून १५७ कर्मचारी आणि १६० पेक्षा जास्त कमिशन एजंट अहोरात्र सेवा देत आहेत. बेरोजगारीच्या आव्हानात्मक काळात या संस्थेने ३०० पेक्षा जास्त व्यक्तींना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक आधार दिला आहे. केवळ नोकरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्जपुरवठा करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे.
गुंतवणूकदारांचा विश्वास आणि आधुनिक योजना
तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून काम करण्याच्या पद्धतीमुळे जनमानसात संस्थेबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. ठेवीदारांसाठी आकर्षक ठेव योजना आणि कर्जदारांसाठी सुलभ कर्ज योजना राबवण्यावर संस्थेचा भर आहे. या यशात ठेवीदार, कर्जदार, सभासद, संचालक आणि हितचिंतक अशा सर्व घटकांचे योगदान असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले आहे.
सामाजिक बांधिलकी आणि प्रोत्साहन भत्ता
संस्थेच्या या उत्तुंग प्रगतीबद्दल चेअरमन बाबुराव कविटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी कर्मचारी वर्गाच्या परिश्रमाचे विशेष कौतुक केले आहे. कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत यंदा नफ्यातून ‘प्रोत्साहन भत्ता’ देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. तसेच, केवळ आर्थिक व्यवहार न थांबता सामाजिक जाणिवेतून शैक्षणिक सक्षमीकरण निधी, शिक्षण व प्रशिक्षण निधीची निर्मिती करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
सभासदांना लाभांशाची भेट
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सभासदांना अधिक स्वरूपात लाभांश (डिव्हिडंड) देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे संकेत चेअरमन बाबुराव कविटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी दिले आहेत.
संस्थेच्या या वाटचालीस सहकार्य केल्याबद्दल व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, संतोष मुसळे, शामसुंदर सावंत, बाबु वरक, शांताराम पवार आणि गोपाळ बाईत यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे आभार मानले आहेत. आगामी काळात तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्राहकांना अधिक प्रगत सेवा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.













