शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय; तातडीने नवा पूल उभारण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
स्वप्निल कदम- कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील जांभवडे ग्रामपंचायत हद्दीतील खोचरेवाडी येथे गडनदी पात्रावरील पूल खचल्याने सुमारे शंभर लोकवस्ती असलेल्या वाडीचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन येण्या-जाण्यावर गंभीर परिणाम झाला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या पुलाची अवस्था धोकादायक असल्याबाबत जांभवडेचे सरपंच अमित मडव यांनी यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे लेखी तसेच तोंडी स्वरूपात वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर दुर्लक्षामुळेच पूल खचल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
खोचरेवाडीतील सुमारे शंभर लोकांसाठी हा पूलच मुख्य आणि एकमेव संपर्क मार्ग होता. पूल खचल्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणेही कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरत्या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा मार्ग गडनदीच्या पात्रातून जात असल्याने पावसाळ्यात त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरत्या मार्गाऐवजी कायमस्वरूपी आणि सुरक्षित पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे आमदार निलेश राणे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देत नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत सरपंच अमित मडव यांनी सांगितले की, संबंधित विभागाला वेळोवेळी सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. जर तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन काम सुरू झाले नाही, तर ग्रामस्थांसह संबंधित विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.













