राजापूर प्रतिनिधी: तालुक्यातील तिठवली येथील रहिवाशी व महावितरण राजापूर कार्यालयातील कंत्राटी वायरमन अनिकेत शांताराम परवडी (वय ३२) याच्या मृत्युप्रकरणी महाविकरण राजापूर कार्यालयातील कंत्राटी ऑपरेटर साहील गुरुनाथ मांजरेकर (वय २८, रा. राजापूर वरचीपेठ) याच्या विरोधात राजापूर पोलीसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
त्याला अटक करून न्यायालयसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तशी माहिती तपास अधिकारी व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे.
गतसप्ताहात मंगळवारी ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील प्रताप सुर्वे यांच्या बागेत ही घटना घडली होती. वायरमन अनिकेत परवडी हे ११ के.व्ही विजवाहिनीच्या लाईटच्या पोलवर काम करण्यासाठी चढले होते. याबाबत त्यांनी महावितरण राजापूर येथील या ऑपरेटरला कल्पना दिली होती. याच वेळी दिनेश हातणकर हा महावितरणचा कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करत होता. या कामासाठी नाटे फिडरचा वीज पुरवठा ऑपरेटरला पुर्वकल्पना देऊन बंद करण्यात आला होता.
अशा प्रकारे लाईनवर काम सुरू आहे याबाबत कंत्राटी ऑपरेटर साहील गुरुनाथ मांजरेकर याला पुर्ण कल्पना होती की, एकाच वेळी दोन ठिकाणी काम सुरू आहे. मात्र वायरमन दिनेश हातणकर याचे काम पूर्ण झाल्यावर ऑपरेटर साहील मांजरेकर याने पेंडखळे येथे अनिकेत परवडी हा वायरमन अजूनही पोलवर काम करत आहे, याची खात्री न करताच आणि त्याला शॉक लागू शकतो याची जाणीव असताना देखील बंद केलेला ११ केव्ही नाटे फिडर विजपुरवठा लाईन चालु केल्याने पेंडखळे येथे विद्युत पोलवर चढून काम करत असलेला वायरमन अनिकेत परवडी याला शॉक लागून तो मयत झाल्याचे तपासावरून निष्पन्न झाले होते.
सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासांती ऑपरेटरचा हलगर्जीपणा आणि जाणीवपूर्वक केलेले कृत्य निष्पन्न झाल्याने, राजापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी साहील मांजरेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी संशय आरोपी ऑपरेटर साहिल मांजेरकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्याने मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्ररकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव तपास करत आहेत.












